scorecardresearch

Premium

“…तर जे दुर्योधन, दुःशासनाच्या नशीबी आलं तेच त्यांच्या नशीबी येईल”; आदित्यनाथ यांचा इशारा

२०१७ च्या पूर्वी राज्यामध्ये गायी सुरक्षित नव्हत्या असंही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्या भाषणात म्हणाले आहेत.

yogi adityanath
योगी आदित्यनाथ. (प्रातिनिधिक फोटो सौजन्य: पीटीआय)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर महत्वाचं वक्तव्य केलं आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना इशारा देताना योगींनी महाभारताचा संदर्भ दिलाय. महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवणाऱ्यांचं तेच होईल जे महाभारतामध्ये दुर्योधन आणि दुःशासनाचं झालं, असं म्हणत योगींनी इशारा दिलाय. तसेच भारताविरोधातील कारवायांमध्ये मदत करणाऱ्यांना कठोर शासन केलं जाईल असंही योगींनी म्हटलं आहे.

योगी आदित्यनाथ यांनी काही महिन्यांमध्ये येऊ घातलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षावर निशाणा साधलाय. “समाजवादी पक्ष हा महिला विरोधी, दलितविरोधी आणि मागास वर्गाविरोधी असण्याबरोबरच हिंदूविरोधी तसेच लहान मुलांच्या अधिकारांविरोधात असणारा पक्ष आहे,” असं योगी म्हणाले आहेत.

“आधी आपल्या बहिणींना, मुलींना शाळेतही जाता येत नव्हतं. तेव्हा गुंडगिरी करणारे या महिलांच्या प्रतिष्ठेसोबत खेळायचे. मात्र आज कोणी अशी हिंमत केली तर जे दुर्योधन आणि दुःशासनाच्या नशीबी आलं तेच त्यांच्या नशीबी येईल,” असं योगी यांनी संबलमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना म्हटलं आहे.

संबलमध्ये योगी आदित्यनाथांच्या हस्ते ६२ योजनांचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रदेशामध्ये या योजनांच्या माध्यमातून २७५ कोटींची कामं केली जाणार आहे. याच कार्यक्रमात योगींनी या योजनांमध्ये पात्र ठरलेल्यांना प्रमाणपत्रांचं वाटपही केलं.

२०१७ च्या पूर्वी राज्यामध्ये गायी सुरक्षित नव्हत्या असंही योगी म्हणाले आहेत. “बैलगाड्या आणि म्हशींचा वापर करुन वापरल्या जाणाऱ्या गाड्या आता दिसत नाहीत. मात्र आम्ही कत्तलखाने बंद केले आणि समाजवादी पक्षाचे तसेच काँग्रेसचे उद्योग बंद झाले,” अशी टीका योगी यांनी यावेळी केली.

भाजपाने कायमच देशाचा विचार केल्याचं योगी यांनी यावेळी म्हटलं आहे. “असे अनेकजण आहेत जे भारतविरोधी शक्तींना आसरा देण्याआधी विचार करत नाहीत. मात्र सध्या (पंतप्रधान नरेंद्र) मोदीजींचे आशीर्वाद आहेत तोपर्यंत कोणीही काहीही करु शकणार नाही. उत्तर प्रदेशामध्ये दंगली घडणार नाहीत,” असं योगी म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dushashan duryodhan fate if someone plays with women dignity yogi adityanath scsg

First published on: 22-09-2021 at 12:42 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×