दिल्लीमध्ये गाडी चालवताना तुमच्याकडून वाहतुकीचा नियम मोडला गेला आणि दंड भरण्यासाठी खिशात पुरेसे पैसे नसतील तर यापुढे काळजी करण्याचे कारण नाही. हा दंड डेबिट अथवा क्रेडिट कार्डद्वारेही भरण्याची सुविधा दिल्ली वाहतूक पोलिसांतर्फे लवकरच पुरविण्यात येणार आहे.
याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, याबाबतचा प्रस्ताव मंजूर झाला असून येत्या काही दिवसांत त्याची अंमलबजावणी होईल. ही सेवा पुरविण्यासाठी विशिष्ट उपकरणाची गरज असून त्यासाठी काही कंपन्यांशी बोलणी सुरू आहेत. कोठेही नेता येणारी ही छोटी उपकरणे आमच्या कर्मचाऱ्यांच्या हातात आल्यानंतर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांना डेबिट अथवा क्रेडिट कार्डद्वारे दंड भरता येईल.
गेल्या वर्षी दाखल झालेल्या ई-चलन या उपकरणामुळे दिल्ली वाहतूक पोलीस तंत्रज्ञानाच्या बाबतीत आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहेत.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांना दंड करताना लेखी पावती देणे दिल्ली वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षीच बंद केले असून त्याची जागा ई-चलनने घेतली आहे.
दिल्ली वाहतूक पोलिसांकडे सध्या अशी बाराशे ई-चलन उपकरणे असून त्या माध्यमातून दररोज सरासरी बाराशे पावत्या फाडल्या जातात.