Who is Sandeepa Virk: ईडीने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर संदीपा विर्कला मनी लाँडरिंगच्या प्रकरणात अटक केली आहे. तिचे इन्स्टाग्रामवर १२ लाख फॉलोअर्स आहेत. ब्युटी ब्रँड हायबूकेअरची ती संस्थापक असल्याचे तिने आपल्या बायोमध्ये म्हटले आहे. ईडीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, संदीपा विर्कला १२ ऑगस्ट रोजी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याखाली अटक केली. त्यानंतर तिला न्यायालयाने १४ ऑगस्टपर्यंतची ईडीची कोठडी सुनावली.
ईडीने असेही म्हटले की, रिलायन्स ग्रुपचे माजी कार्यकारी अधिकारी अंगाराई नटराजन सेथुरामन यांच्याशी असलेले संदीपा विर्कचे कथित संबंधदेखील चौकशीच्या फेऱ्यात आहेत. नटराजन सेथुरामन यांनी मात्र एका निवेदनाद्वारे संदीपा विर्कशी असलेले संबंध आणि तिच्याशी कोणताही व्यवहार केला नसल्याचे म्हटले आहे.
पंजाब पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनंतर सदर चौकशी सुरू झाली. ईडीचा आरोप आहे की, खोट्या आश्वासनांद्वारे विर्कने स्थावर मालमत्ता मिळवली. हायबूकेअर डॉट कॉम या पोर्टलद्वारे ती एफडीए-मान्यताप्राप्त सौंदर्य प्रसाधने विकत असल्याचा दावा करते, मात्र ईडीच्या मतानुसार असे संकेतस्थळ अस्तित्त्वातच नाही.
या संकेतस्थळावर युजर्सची नोंदणी नाही. पेमेंट गेटवेच्याही अडचणी आहेत. तसेच त्याचे सोशल मीडियावर अस्तित्व नाही. संकेतस्थळावर दिलेला व्हॉट्सअप नंबरही निष्क्रिय आहे. त्यामुळेच सदरचे संकेतस्थळ मनी लाँडरिंगसाठी तयार केल्याचा आम्हाला संशय आहे, असे ईडीच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.
कोण आहे संदीपा विर्क, तिच्यावर आरोप काय आहेत?
- संदीपा विर्क hyboocare नावाच्या स्किन केअर उत्पादनांची विक्री करणाऱ्या वेबसाइटची मालकीन असल्याचा दावा करते. मात्र ईडीने ही वेबसाइट मनी लाँडरिंगसाठी तयार केलेला भास असल्याचे म्हटले आहे.
- विर्कच्या इन्स्टाग्रामवर दिलेल्या माहितीनुसार, ती स्वतःला अभिनेत्री आणि उद्योजिका म्हणवते.
- आणखी एका सोशल मीडियावर तिने स्तःला कॉस्मेटोलॉजिस्ट म्हटले आहे.
- ईडीने आपल्या निवेदनात म्हटले की, रिलायन्स कॅपिटल लिमिटेडचे माजी संचालक नटराजन सेथुरामन यांच्याशी ती संपर्कात होती.
- सेथुरामन यांच्या निवासस्थानी ईडीने झडती घेतली असता संदीपाशी संबंध असल्याचे पुरावे आढळल्याचा दावा ईडीने केला आहे.
- रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड (RCFL) चे १८ कोटी रुपये चुकीच्या मार्गाने २०१८ साली वळविण्यात आले होते. नियमांचे उल्लंघन करून हे पैसे सेथुरामन यांना वितरित केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
- ईडीने असाही दावा केला की, रिलायन्स कॅपिटल लिमिटेडने नियमांचे उल्लंघनकरून २२ कोटींचे गृहकर्ज दिले होते. या कर्जांपैकी मोठा भाग दुसरीकडे वळविण्यात आला. ज्याची परतफेड करण्यात आलेली नाही.