एकीकडे चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यादव यांना न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर दुसरीकडे लालूंची कन्या मीसा भारती आणि जावयासह इतर आरोपींवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात आरोपपत्र दाखल केले. यामुळे लालूंच्या कुटुंबियांना न्यायालयांनी एकाच दिवशी दोन झटके दिले आहेत.


लालू कन्या मीसा भारतींसह जावई शैलेशकुमार यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप आहेत. या प्रकरणातील तपास पथकाचे वकिल नितेश राणा यांनी हे आरोपपत्र दाखल केले आहे. मे. मिशेल प्रिंटर्स आणि पॅकर्स प्रा. लि. या कंपनीमधील आर्थिक गैरव्यवहारांमध्ये मीसा भारती आणि त्यांचे पती शैलेशकुमार यांचा हात असल्याचा संशय आहे. या प्रकरणी आजचे नवे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

त्याचबरोबर दिल्लीतील एका आलिशान फार्महाऊससह दिल्लीतच अनेक भागात मीसा भारतींसह त्यांच्या पतीच्या नावे स्थावर मालमत्ता आहेत. ही संपत्ती त्यांनी आर्थिक गैरव्यवहारातून जमवल्याचा आरोप त्यांच्यावर ईडीने ठेवला आहे.

दरम्यान, मीसा भारतींचे वडील लालू प्रसाद यादव यांना रांची येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने  चारा घोटाळ्यात दोषी मानले असून ३ जानेवारी रोजी त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. तोपर्यंत लालूंना रांचीमध्ये न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे.