काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निवासस्थानी ईडीने शुक्रवारी सकाळी छापे घातले. भिलाई इथल्या घरी हे छापे टाकण्यात आले. ईडीने औपचारिक तपास न थांबवलेल्या एका प्रकरणासंदर्भात हे छापे घालण्यात आले.
बघेल यांच्या घरावर छापे घालण्याची वेळ राजकीयदृष्ट्या साधण्यात आल्याची चर्चा आहे. छत्तीसगडच्या विधिमंडळात रायगढमधल्या तमनार इथे मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोडणी करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस या मुद्यावर सत्ताधारी भाजपाला घेरण्याची चिन्हे होती. मात्र त्याआधी ईडीने बघेल यांच्या घरावर छापे टाकले.
बघेल यांच्या कार्यालयाने एक्स अकाऊंटवर म्हटल्याप्रमाणे तमनार इथे अदाणी यांच्या प्रकल्पासाठी हजारो वृक्ष तोडण्यात आलं. हा मुद्दा विधिमंडळाच्या शेवटच्या दिवशी मांडला जाणार होता. मात्र त्याआधीच साहेबांनी ईडीच्या पथकाला माजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पाठवलं. बघेल यांच्या निवासस्थानी चिरंजीव चैतन्य हेही राहतात. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपांखाली चैतन्य यांचं नाव आलं होतं. त्यावेळीही ईडीने छापे घातले होते. कथित मद्य घोटाळ्यात झालेल्या आर्थिक व्यवहारांचा चैतन्य लाभार्थी असल्याचं ईडीने सांगितलं होतं.
मद्य घोटाळ्यामुळे छत्तीसगड राज्याच्या तिजोरीला मोठा फटका बसला. त्याचवेळी मद्याच्या माध्यमातून रॅकेट चालवणाऱ्या टोळीने २,१०० कोटी रुपये वळवल्याचं स्पष्ट झालं आहे. ईडीने भूपेश यांच्या घरी घातलेले छापे मद्यघोटाळ्यापुरते मर्यादित नाहीत. महादेव बेटिंग अॅप घोटाळ्यासंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाने मार्च महिन्यात बघेल यांच्या निवासस्थानी छापे घातले होते. हे छापे राजकीय वैर भावनेतून टाकण्यात आल्याचं बघेल यांनी म्हटलं आहे. ३० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तीसगढ इथे येणार होते. त्यांना भाषणासाठी मुद्दा मिळावा म्हणून हे छापे टाकण्यात आल्याचं बघेल यांनी तेव्हा म्हटलं होतं.
दरम्यान छत्तीसगड सरकारच्या कथित मद्य घोटाळाप्रकरणात बघेल यांनी २०१९ ते २०२२ दरम्यान राज्याच्या तिजोरीमधील २,१६१ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या सिंडिकेटने योग्य कागदपत्रांशिवाय सरकारी दुकानांद्वारे बेहिशेबी मद्य विकून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. परिणामी छत्तीसगड सरकारच्या महसूल विभागाचं खूप मोठं नुकसान झालं आहे. या सिंडिकेटने सरकारच्याच महसुलावर डल्ला मारल्याचा आरोप आहे. बेकायदेशीर, बेहिशेबी मद्यविक्रीसाठी या सिंडिकेटने बनवाट होलोग्राम व बाटल्यांचा वापर केल्याचंही तपासांत आढळलं आहे.