जयपूर :कथित परीक्षा पेपरफूट घोटाळय़ातील आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासाचा भाग म्हणून  सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोिवदसिंह डोटासरा यांच्या जयपूर व सीकर येथील निवासस्थानी छापे घातले. याशिवाय परकीय चलन कायदा उल्लंघनाच्या एका प्रकरणात मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या मुलाला ईडीने चौकशीसाठी पाचारण केले आहे.

शालेय शिक्षण खात्याचे माजी मंत्री असलेले ५९ वर्षांचे डोटासरा यांच्या निवासस्थानाशिवाय, काँग्रेसचे महुवा मतदारसंघातील उमेदवार ओमप्रकाश हुडला यांच्या निवासस्थानीही ईडीने छापे टाकले. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली.

ईडीच्या कारवाईबद्दल काँग्रेसने केंद्र सरकावर टीका केली असून, निवडणूक लढण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तपास यंत्रणाची मदत घेत असल्याचा आरोप केला आहे. लोक भाजपला याचे चोख प्रत्युत्तर देतील, असेही पक्षाने म्हटले आहे.

हेही वाचा >>> पाच राज्यांतील ‘विकसित भारत यात्रा’ ५ डिसेंबरनंतरच; निवडणूक आयोगाचे केंद्र सरकारला निर्देश

 देशात दहशत पसरवण्यात येत असल्याचे सांगून मुख्यमंत्री गहलोत यांनी ईडीच्या कारवाईवर जोरदार टीका केली आहे. भाजपला आपले सरकार उलथून टाकता न आल्यामुळे तो आपल्याला ईडीच्या छाप्यांच्या माध्यमातून लक्ष्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

 परदेशी चलन कायद्याच्या कथित उल्लंघनाशी संबंधित एका प्रकरणात चौकशीसाठी राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र वैभव गहलोत यांनाही ईडीने पाचारण केले आहे. ईडीच्या मुख्यालयात शुक्रवारी ईडीपुढे साक्ष नोंदवण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. मात्र, ईडीसमोर सादर करण्यासाठी २०११ सालापासूनची कागदपत्रे आवश्यक असल्यामुळे ते यासाठी नवी तारीख मागतील अशी अपेक्षा आहे.

निवडणुका जवळ येताच ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभाग हे भाजपचे खरे ‘पन्ना प्रमुख’ बनतात. राजस्थानमध्ये पराभव निश्चित असल्याचे पाहून, भाजपने अखेरचा फासा फेकला आहे. आम्ही या यंत्रणांच्या दुरुपयोगाविरुद्ध लढा सुरूच ठेवू.   – मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस</strong> अध्यक्ष

ज्या ज्या वेळी विधानसभा निवडणुका होतात, त्या त्या वेळी ईडी छापे घालते. छत्तीसगड, कर्नाटक, हिमाचल प्रदेशात हेच घडले आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरी काँग्रेस घाबरणार नाही. निवडणुका आम्हीच जिंकू.  – अशोक गहलोत, मुख्यमंत्री