सीमेपलीकडून देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पैशाची साठेबाजी केल्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने हिज्बुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहउद्दीन याच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने पैसे साठेबाजी प्रतिबंधक कायद्यान्वये एनआयएने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ही कारवाई केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या सूत्रांनी सांगितले की, एनआयए पाकिस्तानातून हिज्बुल मुजाहिद्दीन विविध दहशतवादी संघटनांना करीत असलेल्या अर्थपुरवठय़ाबाबत तसेच दहशतवादी कारवायांबाबत तपास करीत आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने गेल्या वर्षी प्रत्यक्ष ताबा रेषेवरून होत असलेल्या व्यापाराच्या संदर्भात १० जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. त्यात सलाहउद्दीन, त्याचा उपप्रमुख गुलाम नबी खान उर्फ आमीर खान, उमेर फारूख, मंझूर अहमद दर उर्फ मसरूर दर, जफर हुसेन भट उर्फ खुर्शीद नझीर अहमद दर उर्फ शाबीर इलाही, अब्दुल माजीद सोफी उर्फ माजीद बिसाटी व मुबारक शहा यांचा समावेश आहे. तालिब अली उर्फ तालिब हुसेन लाली व महंमद शफी शहा उर्फ डॉक्टर उर्फ दाऊद याच्यावर बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये आरोपपत्र दाखल केले आहे. सलाहउद्दीनचे नाव अंमलबजावणी संचालनालयाच्या खटल्यात ‘पीएमएलए’ म्हणजे बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये नमूद करण्यात आले आहे. परदेशातील दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवण्यासाठी तो पैशांची साठेबाजी करीत असे.
राष्ट्रीय तपास संस्थेने केलेल्या चौकशीत असा दावा करण्यात आला की, काश्मीरमधील उरी भागात १३ कोटी रूपये पाठवण्यात आले. कुरियरद्वारे हे पैसे येत होते. बँकिंग व हवाला मार्गाचाही त्यासाठी वापर करण्यात आला. राष्ट्रीय तपास संस्थेने २५ ऑक्टोबर २०११ रोजी हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवादी कारवायांना होत असलेल्या अर्थपुरवठय़ाबाबत रीतसर गुन्हा दाखल केला होता. जम्मू-काश्मीर अफेक्टीज रिलीफ ट्रस्ट या संस्थेच्या नावाने पाकिस्तानातून हिज्बुल मुजाहिद्दीन पैसे पाठवत असे. चौकशीअंती महंमद शफी शहा उर्फ दाऊद व तालिब लाली उर्फ तालिब हुसेन लाली यांना राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली होती. अंमलबजावणी संचालनालयाने हिज्बुल मुजाहिद्दीनच्या काही आरोपींची मालमत्ताही जप्त केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Mar 2014 रोजी प्रकाशित
दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवल्याप्रकरणी सलाहउद्दीनसह १० जणांविरोधात गुन्हा दाखल
सीमेपलीकडून देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पैशाची साठेबाजी केल्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने हिज्बुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहउद्दीन याच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
First published on: 12-03-2014 at 01:34 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed registers money laundering case against hizbul chief