संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये ७३ व्या अधिवेशनामध्ये पाकिस्तानने भारतावर केलेल्या शाब्दिक हल्ल्याला भारताने जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सचिव इमन गंभीर यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. ‘पाकिस्तानमध्ये नवीन सरकार आल्यानंतर काही बदल होईल असे वाटले होते. मात्र आधीच्या आणि आताच्या पाकिस्तानमध्ये काहीही बदल झाला नाही. आम्ही येथे नवीन पाकिस्तानला ऐकण्यासाठी आलो होतो. मात्र येथे आल्यानंतर पाकिस्तानमध्ये काहीही बदल झाल्याचे जाणवले नाही. पाकिस्तानच्या कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झाला नाही. त्यांची शैली पूर्वीप्रमाणेच आहे.’ असे गंभीर म्हणाल्या.

पुढे बोलताना इमन म्हणाल्या की, ‘पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालणे बंद करून स्वत:च्या विकासाकडे लक्ष द्यावे. पाकिस्तान शेजारील देशावर हल्ला करण्यासाठी दहशतवादाची निर्मीती करतेय.’ पाकिस्तानमध्ये भारत दहशतवाद पेरत असल्याचा आरोप यावेळी इनम यांनी फेटाळून लावला आहे. त्या म्हणाल्या की, पाकिस्तान बिनबुडाचे आरोप करत आहे.

पाकिस्तानने असा आरोप केला होता की, २०१४ मध्ये पेशावरमधील शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचा हात होता. पाकिस्तानच्या या आरोपाला उत्तर देताना इमन म्हणाल्या की, ‘पाकिस्तानमधील पेशावरच्या शाळेवर झालेल्या हल्याचा भारताने निषेध केला होता. भारतीय संसदेत यावर मौन राहून श्रद्धांजली आर्पित केली होती. तसेच भारतातील अनेक शाळेतील विद्यार्थीिनी दोन मिनीटांचे मौन राखले होते. आमच्यावर बिनबुडाचे आरोप करून पाकिस्तान पेशावर हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लहान मुलांचा अपमान करत आहे. ‘

 

पाकिस्तान दहशतवाद्यांचा गौरव करतो, सुषमा स्वराज यांचा संयुक्त राष्ट्रात हल्लाबोल

शनिवारी संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये बोलताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानला खडे बोल सुनावले. आज दहशतवादाचा राक्षस जगाच्या प्रत्येक देशापर्यंत पोहोचला आहे. भारत कित्येक वर्षांपासून दहशतवादाची झळ सोसतोय. महत्वाचं म्हणजे दहशतवादाचे हे आव्हान कुठल्या दूरच्या देशामुळे नव्हे तर शेजारी देशामुळे निर्माण झाले आहे. हा देश दहशतवाद पसरवण्यातच नव्हे तर दहशतवादाचे आरोप फेटाळून लावण्यातही माहीर आहे अशी बोचरी टीका स्वराज यांनी केली.

पाकिस्तानकडून अणुबॉम्बची धमकी

भारताकडून सतत एलओसीवर सीजफायरचं उल्लंघन केलं जातं. आम्हाला हे सांगायचंय की आमच्या संयमाचा अंत पाहू नका. भारताने एलओसी पार केली किंवा लिमिटेड वॉरचा प्रयत्न केला तर त्यांना मोठा पलटवार झेलावा लागेल. दक्षिण आशियामध्ये न्युक्लिअर संतुलन ठेवण्याची बातचीत केली जाते. पण पाकिस्तान न्युक्लिअर शस्त्रांचा वापर न करण्याची खात्री देऊ शकत नाही, असं कुरैशी म्हणाले.