वृत्तसंस्था, जेरुसलेम
इस्रायल आणि हमासदरम्यान करण्यात आलेल्या शस्त्रविरामाला आणखी मुदतवाढ मिळावी यासाठी कतारच्या पुढाकाराने प्रयत्न सुरू आहेत. नियोजित समझोत्यानुसार हा शस्त्रविराम करार सोमवारी संपुष्टात येणार होता. त्याला दोन दिवसांची मदुतवाढ मिळाल्यानंतर बुधवारी त्याचा अखेरचा दिवस आहे. मात्र, अद्याप हमासच्या ताब्यातील सर्व ओलिसांची सुटका झालेली नाही, तसेच इस्रायलच्या ताब्यात बरेच पॅलेस्टिनी कैदी आहेत.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन हे पुन्हा एकदा इस्रायल आणि पश्चिम आशियाई देशांचा दौरा करत असून कराराला मुदतवाढ मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हा करार कतार आणि इजिप्तबरोबरच अमेरिकेच्या पुढाकाराने करण्यात आला आहे. विविध देशांमधील नागरी संघटनाही शस्त्रविरामाला मुदतवाढ मिळावी अशी मागणी करत आहेत.दुसरीकडे, शस्त्रविरामामुळे गाझा पट्टीत थोडीफार शांतता असून, लोकांपर्यंत मदत सामग्री पोहोचत आहे. इंधनपुरवठाही पूर्ववत सुरू झाल्यामुळे काही प्रमाणात लोकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, हा इंधनपुरवठा पुरेसा नाही. गाझाची दररोजची गरज १० लाख लीटर इंधनाची असताना जेमतेम दीड लाख लीटर इंधन मिळत आहे. ठप्प झालेली आरोग्यव्यवस्था आणि वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी हे इंधन वापरले जात आहे.