इजिप्तचे पदच्युत अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांचे लष्कराने अपहरण केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी केला. या प्रकरणी लष्करप्रमुख आणि त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांविरोधात कायदेशीर लढा देण्याचा इशाराही मोर्सी यांच्या कुटुंबाने दिला.
देशात रक्तपात घडवणाऱ्या लष्कराचा प्रमुख अबदेल फताह एल सिसी आणि त्याच्या साथीदारांविरोधात स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा निर्धार मोर्सीची मुलगी शैमा मोहमद हिने पत्रकारांशी व्यक्त केला.
अध्यक्ष मोर्सी यांची सुरक्षितता आणि आरोग्यासाठी लष्करप्रमुख आणि त्यांच्या साथीदार जबाबदार असल्याचे शैमा हिने सांगितले.
३ जुलै रोजी ६१ वर्षीय मोर्सी यांना अध्यक्षपदावरून पदच्युत केल्यानंतर त्यांना कुठल्याही आरोपाशिवाय अज्ञातस्थळी डांबून ठेवण्यात आले आहे. देशात प्रथमच लोकशाही मार्गाने अध्यक्षपदी निवडून आलेल्या मोर्सी यांना पदच्युत केल्यानंतर प्रथमच त्यांच्या कुटुंबीयांकडून जाहीर निवेदन करण्यात आले.
मोर्सी यांचा मुलगा ओसामा याने आपल्या वडिलांचे लष्कराकडून झालेले अपहरण संपूर्ण देशासाठी मोठा धक्का आहे. त्यांना डांबून ठेवण्यामागे कोणतेही कारण दिसून येत नाही. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत तसेच आरोग्याची हेळसांड झाल्यास लष्करप्रमुख आणि त्यांचे वरिष्ठ साथीदार जबाबदार राहतील, तसेच लष्कराच्या या कृतीविरोधात कायदेशीर लढा देण्याचा निर्धारही ओसामा याने बोलून दाखविला.
आम्ही आमच्या पित्याला शेवटचे ३ जुलै रोजी भेटलो.त्यानंतर आजतागायत त्यांच्याशी संपर्क झाला नसल्याचेही त्याने सांगितले.