आइनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताचा आधार घेऊन तयार केलेल्या नवीन पद्धतीने प्रथमच एक नवीन बाह्य़ग्रह शोधून काढण्यात आला आहे. आइनस्टाईन ग्रह असे जरी त्याला म्हटले जात असले तरी त्याचे खरे नाव ‘केप्लर ७६ बी’ असे आहे व तो उष्ण गुरू ग्रहासारखा आहे. तो त्याच्या मातृताऱ्याभोवती १.५ दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. त्याचा व्यास गुरूपेक्षा २५ टक्के अधिक असून वजन दुप्पट आहे. एफ प्रकारच्या ताऱ्याभोवती तो फिरत असून हा तारा पृथ्वीपासून २००० प्रकाशवर्षे दूर हंस तारकासमूहात आहे. या ग्रहाचे वैशिष्टय़ म्हणजे त्याची एकच बाजू या ताऱ्याला सामोरी येत होती. ज्या प्रमाणे चंद्र हा पृथ्वीशी गुरूत्वीय बलाने बंदिस्त आहे तसेच काहीसे हे आहे. त्यामुळे ‘केप्लर ७६ बी’ या ग्रहाचे तापमान १९८२ अंश सेल्सियस आहे.
या ग्रहावर अतिशय वेगवान वारे असून ते उष्णता वाहून नेतात, त्यामुळे त्याचा उष्ण बिंदू हा १६०९३.४ कि.मी. अंतरावर आहे. हा परिणाम स्पिटझर दुर्बीणीच्या मदतीने केलेल्या निरीक्षणात दिसून आला आहे.‘रॅडियल व्हेलॉसिटी’ व ‘ट्रान्झिट’ अशा दोन तंत्रज्ञानांचा वापर हा ग्रह शोधण्यासाठी केला जातो. नवीन पद्धतीत, जेव्हा ग्रह हा ताऱ्याभोवती फिरत असतो त्या वेळी घडून येणाऱ्या तीन परिणामांचा अभ्यास केला जातो. आइनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतावर आधारित पद्धतीचा वापर करून बाह्य़ग्रह शोधण्यात प्रथमच यश आले आहे, असे या संशोधन निबंधाचे सह लेखक व तेल अविव विद्यापीठातील वैज्ञानिक तेसवी मझेह यांनी सांगितले. हा नवीन ग्रह शोधून काढल्यानंतर अ‍ॅरिझोनातील व्हिपल वेधशाळेतील ट्रेस वर्णपंक्तीमापकाने गोळा केलेल्या रॅडियल व्हेलॉसिटी निरीक्षणांनी त्याची खातरजमा करण्यात आली. फ्रान्सच्या हॉट प्रोव्हेन्स वेधशाळेतील ‘सोफी’ या वर्णपंक्तीमापकाने घेतलेल्या निरीक्षणातही या ग्रहाचे अस्तित्व स्पष्ट झाले आहे.