पीटीआय, नवी दिल्ली

बिहारमध्ये १ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या मसुदा मतदारयादीतून नावे समाविष्ट करण्याची किंवा काढून टाकण्याची मागणी कोणत्याही राजकीय पक्षाने अद्याप केलेली नाही, अशी माहिती निवडणूक आयोगाने रविवारी दिली.

निवडणूक आयोगाने सांगितले की, शुक्रवारी १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते रविवार, ३ ऑगस्ट दुपारी ३ वाजेपर्यंत, राजकीय पक्षांकडून दावे आणि हरकतींखालील कोणतीही मागणी प्राप्त झालेली नाही. परंतु वैयक्तिकरित्या मतदारांकडून नावे समाविष्ट करण्यासाठी किंवा मतदारयादीतून अपात्र असल्याचा दावा करणाऱ्यांना काढून टाकण्यासाठी ९४१ दावे आणि हरकती प्राप्त झाल्या आहेत.

मतदारयादीतून नावे समाविष्ट करण्याची किंवा काढून टाकण्याची मागणी करण्यासाठी राजकीय पक्ष आणि मतदारांना १ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. तर अंतिम मतदारयादी ३० सप्टेंबर रोजी प्रकाशित होणार असून त्यातून कोणताही पात्र मतदार वगळला जाणार नाही याची खात्री केल्याचे आयोगाने म्हटले आहे.

तेजस्वी यांच्याकडे ‘ईपीआयसी’ची मागणी

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी त्यांचे मतदार छायाचित्र ओळखपत्र (ईपीआयसी) अधिकृतपणे जारी न केल्याने ते तपासण्यासाठी ताब्यात देण्याची मागणी निवडणूक आयोगाने केली. बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या यादव यांनी मसुदा मतदारयादीतून आपले नाव गहाळ झाल्याचा दावा केला होता. मात्र, यादव यांनी चुकीच्या पद्धतीने हाताळणी केली असून ओळखपत्र अधिकृतपणे जारी केले नव्हते असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.