केंद्रीय निवडणूक आयोगाने सोशल मीडियावर विंग कमांडर अभिनंदन यांचे छायाचित्र असलेले पोस्टर शेअर करणाऱ्या भाजपा नेत्याला दणका दिला आहे. दिल्लीतील भाजपा आमदार ओम प्रकाश शर्मा यांनी फेसबुकवर शेअर केलेले दोन पोस्टर हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने फेसबुकला दिले आहे. या दोन्ही पोस्टरवर अभिनंदन यांचे छायाचित्र होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणूक प्रचार आणि वातावरण निर्मितीत समाजमाध्यमांची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने समाजमाध्यमांसाठी काही निकष निश्चित केले आहेत.समाजमाध्यमांवरील राजकीय जाहिरातींच्या संबंधातील तक्रारी स्वीकारण्यासाठी एका तक्रार अधिकाऱ्याचीही (ग्रिव्हन्स ऑफिसर) नियुक्ती करण्यात आली आहे. याअंतर्गत निवडणूक आयोगाने पहिली कारवाई भाजपा आमदाराच्या पोस्टवर केली आहे. दिल्लीतील भाजपा आमदार ओम प्रकाश शर्मा यांनी 1 मार्च फेसबुकवर दोन पोस्टर शेअर केले होते. यात विंग कमांडर अभिनंदन यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे छायाचित्र होते.

यातील एका पोस्टरवर म्हटले होते की, मोदींनी इतक्या कमी वेळात अभिनंदन यांना भारतात परत आणणे, हे भारताचा मोठा विजय आहे. तर दुसऱ्या पोस्टरवर पाकिस्तानची शरणागती, देशाचा वीर जवान मायदेशी परतला, असे म्हटले होते. या दोन्ही पोस्टरसंदर्भात निवडणूक आयोगाकडे ‘सी-व्हिजिल’ अ‍ॅपद्वारे तक्रार आली होती. या तक्रारींची दखल घेत निवडणूक आयोगाने दोन्ही पोस्टर हटवण्याचे आदेश दिले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election commission facebook remove political posters with abhinandan photograph
First published on: 13-03-2019 at 07:42 IST