आपल्या भाषणाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असल्याचे उत्तर भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील उपनेते आणि खासदार गोपीनाथ मुंडे यांनी निवडणूक आयोगाच्या ‘कारणे दाखवा’ नोटिसीला दिले. निवडणूक आयोगाने नोटीस मागे घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. 
मागील लोकसभा निवडणुकीत तब्बल आठ कोटी रुपये खर्च केल्याची ‘कोटी’ मुंडे यांनी मुंबईत २७ जून रोजी झालेल्या एका कार्यक्रमात केली होती. ‘२००९च्या लोकसभा निवडणुकीत मी तब्बल आठ कोटी रुपये खर्च केले,’ असे मुंडे म्हणाले होते. लोकसभा निवडणूक खर्चाची मर्यादा २५ लाख असताना मुंडे यांनी स्वत:च आठ कोटी खर्च केल्याचे म्हटल्याने त्यांची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. मुंडेंच्या वक्तव्याचा अभ्यास केल्यानंतर आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. याच नोटिसीला मुंडे यांनी उत्तर दिले आहे.