पीटीआय, नवी दिल्ली
निवडणूक आयोगातर्फे लवकरच देशव्यापी मतदारयाद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यासाठी देशभरातील निम्म्याहून अधिक मतदारांना कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची गरज पडणार नाही अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.
यापूर्वी देशातील बव्हंशी राज्यांमध्ये २००२ ते २००४दरम्यान ‘एसआयआर’ मोहीम राबवण्यात आली होती. त्यामध्ये नोंदणी करण्यात आलेल्या मतदारांचा नव्या मतदारयादीमध्येही समावेश केला जाईल, तसेच प्रस्तावित देशव्यापी ‘एसआयआर’साठी २००२ ते २००४ यादरम्यानची ‘एसआयआर’ची अखेरची तारीख मानली असे अधिकाऱ्यांनी सांगितले. देशव्यापी ‘एसआयआर’ सुरू करण्यासाठी तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.
राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना (सीईओ) आपापल्या राज्यांमध्ये ‘एसआयआर’नंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदारयाद्या तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
मतदानयंत्रांवर रंगीत फोटो
बिहारमधील विधानसभा निवडणुकीपासून मतदानयंत्रांवर आता उमेदवारांची रंगीत छायाचित्रे असणार आहेत. मतदानयंत्रांवर २०१५पासून उमेदवारांची कृष्णधवल छायाचित्रे वापरली जातात. ती ओळखणे अवघड जात असल्याच्या तक्रारी मतदारांनी यापूर्वी केल्या आहेत. यंत्रांवर अनुक्रमांकही ठळकपणे दर्शवला जाईल अशी माहिती निवडणूक आयोगाने बुधवारी दिली.