election commission reply to rahul Gandhi : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा एकादा गंभीर आरोप केले आहेत. यानंतर राहुल गांधी यांच्या आरोपांवर कर्नाटक निवडणूक आयोगाने पत्राद्वारे उत्तर दिले आहे. कर्नाटक निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांनी त्यांनी केलेल्या ‘मत चोरी’च्या दाव्यांसंबधी त्यांची स्वाक्षरी असलेले शपथपत्र सादर करण्यास सांगितले आहे.

तसेच मतदार यादीत चुकीच्या पद्धतीने समावेश करण्यात आलेल्या मदतारांची नावे देखील द्यावीत, जेणेकरून आवश्यक कार्यवाही सुरू करता येईल, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. याबरोबरच निवडणूक आयोगाने राहुल गांधी आणि काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाला शुक्रवारी दुपारी १ ते ३ दरम्यान भेटीसाठी वेळ दिला आहे.

मतदार याद्या या अत्यंत पारदर्शक पद्धतीने तयार केल्या गेल्याचा मुद्दा नमूद करत कर्नाटक निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, “निवडणूक निकालांवर फक्त उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करून प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. मतदार नोंदणी नियम, १९६० च्या नियम २०(३)(ब) अंतर्गत तुम्ही स्वाक्षरी केलेले घोषणापत्र/शपथ याबरोबर अशा मतदारींची नावे पाठवावीत अशी विनंती आहे, जेणेकरून आवश्यक कार्यवाही सुरू करता येईल,” असे कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

या पत्राबरोबर जोडण्यात आलेल्या घोषणापत्रात असे नमूद करण्यात आलेले आहे की, खोटे पुरावे सादर करणे बीएनएसच्या कलम २७७ अंतर्गत शिक्षेला पात्र आहे आणि मतदार यादीबद्दल खोटे घोषणापत्र जारी करणे हे लोकप्रतिनिधी कायदा १९५०च्या कलम ३१ अतंर्गत शिक्षेस पात्र आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?

दरम्यान निवडणूक आयोगाच्या या मागणीवर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी म्हणाले, “मी हे सर्वांना जाहीरपणे सागंत आहे. हे शपथ म्हणून घ्या. हा त्यांचा डेटा आहे, आणि आम्ही त्यांचा डेटा दाखवत आहोत. हा आमचा डेटा नाही. विशेष म्हणजे त्यांनी ही माहिती नाकारलेली नाही.”

“मी एक राजकारणी आहे. मी जे काही लोकांनी सांगतो तो माझा शब्द आहे. मी हे सर्वांना जाहीरपणे सांगत आहे. ही शपथ म्हणून घ्यावी. हा त्यांचा डेटा आहे आणि आम्ही त्यांचा डेटा दाखवत आहोत. हा आमचा डेटा नाही. हा निवडणूक आयोगाचा डेटा आहे. विशेष म्हणजे त्यांनी माहिती नाकारलेली नाही. त्यांनी सांगितले नाही की ज्या मतदार यादीबद्दल राहुल गांधी बोलत आहेत ती चुकीची आहे. ते चुकीचे आहेत असे तुम्हा का म्हणत नाहीत? कारण तुम्हाला सत्य माहित आहे. तुम्ही हे देशभर केले आहे हे आमच्या लक्षात आले आहे हे तुम्हाला महिती आहे,” असे राहुल गांधी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.

कर्नाटकच्या सीईओंनी असेही सांगितले की कर्नाटकातील खासदारांच्या निवडीला आता आव्हान दिले जाऊ शकत नाही कारण अशा निवडणूक याचिकेची मुदत संपली आहे.

दरम्यान राहुल गांधी यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे गांधी म्हणाले आहेत. तसेच त्यानी निवडणूक आयोगाने भाजपाशी संगनमत करून काम केल्याचा आरोपही केला आहे.