खुल्यामध्ये शौचाला बसणे एका शेतकऱ्याला चांगलेच महाग पडले. पहाटेच्या सुमारास शौचाला गेलेला हा शेतकरी हत्तीच्या तावडीत सापडला. निरंजन शाहीश (५५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. हत्तीने शौचास बसलेल्या निरंजन यांना आपल्या सोंडेमध्ये उचलून पळ काढला व ५० मीटर दूर नेऊन फेकले. पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यात ही दुर्देवी घटना घडली.

निरंजन यांना जमिनीवर फेकल्यानंतर हत्ती जंगलामध्ये गायब झाला. पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. हत्तीने फेकल्यानंतर निरंजन काही वेळ तिथेच पडून होते. वनखात्याचे अधिकारी आल्यानंतर त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले. तिथून त्यांना रुग्णालयात हलवले. निरंजन यांच्या पायाला आणि पाठिला मार लागला आहे. पण त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नाही.

अन्नाच्या शोधात हत्ती गावामध्ये घुसला असावा असे निरंजन यांनी वनअधिकाऱ्यांना सांगितले. पुरुलियामधील अयोध्या टेकडीवरील घाटबेरा गावात निरंजन शाहीश राहतात. लवकरच ते चालू-फिरु शकतात. हत्ती आपल्या दिशेने येतो आहे हे त्यांना समजले. पण काही कळण्याच्याआधीच हत्तीने त्यांना आपल्या सोंडेमध्ये उचलले. मी मरणार असेच मला वाटत होते. मी सतत देवाचा धावा करत होतो असे निरंजन यांनी सांगितले.