२०१४च्या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीचा डाव रचणाऱ्या पक्षांनी संसदेच्या अधिवेशनातच एकत्र येण्यास सुरुवात केली आहे. बुधवारपासून सुरू झालेल्या या सरकारच्या कार्यकालातील अखेरच्या अधिवेशनात याचे दर्शन घडणार आहे. काँग्रेसेतर आणि भाजपेतर पक्ष संसद सभागृहात एकत्र बसून समान मुद्दय़ांवर सरकारला धारेवर धरणार आहेत, असे या पक्षांनी सांगितले.
डावे पक्ष, समाजवादी पक्ष, संयुक्त जनता दल, धर्मनिरपेक्ष जनता दल, अण्णा द्रमुक, बिजू जनता दल, आसाम गण परिषद, झारखंड विकास मोर्चा आदी पक्षांनी बुधवारी तिसऱ्या आघाडीबाबत निर्णय घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. जनतेचे प्रश्न, धर्मनिरपेक्षता आणि अन्य सर्वसामान्य मुद्दय़ांवर आम्ही ऐक्य केले असून, संसदेच्या कामकाजात आम्ही एक आघाडी म्हणून काम करणार आहोत, असे सांगण्यात आले. ‘‘आगामी पंतप्रधान काँग्रेस किंवा भाजपचा नसावा यासाठी ऑक्टोबरमध्ये आम्ही सर्व पक्ष एकत्र आलो. सध्या जनता अनेक समस्यांनी त्रस्त आहे. या समस्यांविरोधात आम्ही एकत्र आवाज उठवणार आहोत,’’ असे माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी सांगितले.