फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची पुन्हा एकदा देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये मॅक्रॉन यांचा विजय झाला असून ते सलग दुसऱ्यांदा फ्रान्सच्या राष्ट्रध्यक्षपदी विराजमान होणार आहे. मॅक्रॉन यांनी विरोधी नेत्या असणाऱ्या मरीन ले पेन यांना मोठ्या फरकाने पराभूत केलं. मॅक्रॉन यांना ५८ टक्के मतं मिळाली तर पेन यांना ४२ टक्के मते मिळाली.

फ्रान्समध्ये रविवारी राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीच्या मतदानातील दुसरा टप्पा पार पडला. पेन यांनी पराभव स्वीकारला असून त्यांनी मॅक्रॉन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पेन यांनी खुल्या मनाने मॅक्रॉन यांचं अभिनंदन करत, “निवडणुकीमध्ये त्यांची कामगिरीच एखाद्या मोठ्या विजयासारखी आहे,” असं म्हटलं आहे. फ्रान्समधील वेगवेगळ्या संस्थांनी मॅक्रॉन यांनाच पुन्हा एकदा संधी मिळेल असा अंदाज व्यक्त केला होता, जो खरा ठरला.

यापूर्वी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा मॅक्रॉन यांनी मरीन ली पेन यांनाच पराभूत केलं होतं. मरीन ली पेन यांनी तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढली. मात्र यंदाही त्यांना अपयशच आलं. निवडणूक पूर्व सर्वेक्षणामध्ये फ्रान्सच्या जनतेचा कौल मॅक्रॉन यांच्या बाजूने असल्याचं स्पष्ट झालं होतं. मॅक्रॉन यांनी करोना कालावधीत केलेलं काम, युक्रेन युद्धासंदर्भातील भूमिका आणि जागतिक स्तरावरील संघटनेंसोबत ठेवलेले संबंध या सर्व गोष्टींच्या आधारे त्यांच्या बाजूने मतदान झाल्याचं सांगण्यात येतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मॅक्रॉन हे पत्नी ब्रिगिट आणि मुलांसहीत आयफेल टॉवरजवळ चॅम्प डे मार्स येथे उभारण्यात आलेल्या मंचावर पोहोचले. त्यांनी राष्ट्रगीत म्हटलं. त्यानंतर लोकांना संबोधित करताना मॅक्रॉन यांनी, “मला एक निष्पक्ष समाज हवा आहे. असा समाज तिथे महिला आणि पुरुषांमध्ये समानता असेल. येणारी काही वर्ष नक्कीच कठीण असतील. मात्र ती ऐतिहासिक असतील. नवीन पिढ्यांसाठी आपल्याला एकत्र येऊन काम करावं लागणार आहे,” असं मॅक्रॉन म्हणाले.