शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी पुण्यात निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते १०० वर्षांचे होते. बाबासाहेबांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात शोककळा पसरली आहे. बाबासाहेबांच्या निधानानंतर राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी मराठीमधून श्रद्धांजली अर्पण केली आहे.

न्यूमोनियाचा संसर्ग झाल्याने बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर त्यांना गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी सकाळी ५ वाजून ७ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाची माहिती दिली.

“बाबासाहेब आज आपल्यात नसले तरी इतिहासाच्या पानांवर यापुढे आढळतील”; संजय राऊतांनी व्यक्त केला शोक

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करुन बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “बाबासाहेब पुरंदरे यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी ऐकून मन अत्यंत व्यथित झाले आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गौरवपूर्ण चरित्र जनमानसात रुजवण्याचे भगीरथ कार्य केले. जाणता राजा नाटकाच्या माध्यमातून त्यांनी धर्मरक्षक शिवछत्रपतींची जीवनगाथा तरुणांपर्यंत पोहोचवली,” असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

“काही वर्षांपूर्वी पुरंदरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी विस्तृत चर्चा करण्याचे सौभाग्य लाभले. त्यांची ऊर्जा व विचार प्रेरणादायी होते. आज त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे. त्यांचे कुटुंबीय व प्रशंसकांच्या प्रति संवेदना व्यक्त करतो. आई भवानीच्या चरणी त्यांना चिरशांती लाभो,” अशा भावना अमित शाह यांनी व्यक्त केल्या.

बाबासाहेबांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन बाबासाहेबांच्या भेटीदरम्यानचा फोटो ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान मोदींनी बाबासाहेबांच्या निधनामुळे कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. “शब्दांमध्ये मांडता येणार नाही असं दु:ख मला झालं आहे. बाबासाहेब पुरंदरेच्या निधनामुळे इतिहास आणि संस्कृतिक क्षेत्रामध्ये कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झालीय. त्यांच्या प्रयत्नांमुळेच भविष्यातील पिढ्या छत्रपती शिवाजी महारांजांशी जोडलेल्या राहतील. त्यांनी केलेलं इतर कामही कायमच स्मरणात राहील,” असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.