“बाबासाहेब आज आपल्यात नसले तरी इतिहासाच्या पानांवर यापुढे आढळतील”; संजय राऊतांनी व्यक्त केला शोक

बाळासाहेब ठाकरे ज्या मोजक्या लोकांच्या पायाला स्पर्श करत त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे होते. असे संजय राऊत म्हणाले.

Even if Babasaheb purandare is not with us today he will be found in the pages of history Sanjay Raut expressed grief
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे प्राणज्योत मालवली आहे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी १५ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी निधन झाले आहे. बाबासाहेबांवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. ते १०० वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपाचार सुरू होते. बाबासाहेबांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली वाहिली आहे.

“महाराष्ट्रामध्ये जो इतिहास लोकांपर्यंत पोहोचला नव्हता तो बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या वाणीतून, लेखणीतून आणि नाट्यकृतीमधून जगभरात पोहोचवला. बाबासाहेब पुरंदरे हे फक्त शिवशाहीर नव्हते तर महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनाचे एक अविभाज्य अंग होते. प्रत्येकाच्या कुटुंबात कोणत्या ना कोणत्या रुपाने त्यांना स्थान होते. शिवसेना परिवाराशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नसले तरी इतिहासाच्या पानापानांवर यापुढे आपल्याला आढळतील. इतिहास कसा सांगावा आणि कसा पोहोचवावा याचा ते आदर्श परिपाठ होते,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“बाबासाहेब आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाते जिव्हाळ्याचे होते. बाळासाहेब ज्या मोजक्या लोकांच्या पायाला स्पर्श करत त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे होते. अनेकदा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यासंदर्भात ते बाबासाहेबांसोबत चर्चा करत असत. दोघांनाही इतिहास घडवण्याचे वेड होते. बाबासाहेब इतिहास सांगत होते आणि बाळासाहेब त्याचा आधार घेऊन इतिहास घडवायचा प्रयत्न करत होते. दोघांमध्येही अतूट नाते होते. मातोश्रीवरुन जेव्हा बाळासाहेबांची अंत्ययात्रा निघाली आणि शिवाजी पार्क येथे पोहोचली तेव्हा एका इमारतीच्या खिडकीमध्ये बाबासाहेब उभे होते तेव्हा त्यांना भावनाविवश होऊन बाळासाहेबांना अभिवादन करताना आम्ही पाहिले आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले.

बाबासाहेबांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन बाबासाहेबांच्या भेटीदरम्यानचा फोटो ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान मोदींनी बाबासाहेबांच्या निधनामुळे कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. “शब्दांमध्ये मांडता येणार नाही असं दु:ख मला झालं आहे. बाबासाहेब पुरंदरेच्या निधनामुळे इतिहास आणि संस्कृतिक क्षेत्रामध्ये कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच भविष्यातील पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडलेल्या राहतील. त्यांनी केलेलं इतर कामही कायमच स्मरणात राहील,” असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Even if babasaheb purandare is not with us today he will be found in the pages of history sanjay raut expressed grief abn