सुमारे ७०० कोटी रुपयांचे हवाला रॅकेट चालविण्याच्या आरोपाखाली गेल्या महिन्यात सूरत येथून अटक करण्यात आलेला अफ्रोझ फत्ता याच्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बुधवारी आणखी एक गुन्हा दाखल केला आह़े. परकीय चलन व्यवस्थापन कायद्या अंतर्गत त्याच्याविरोधात आधीच गुन्हा दाखल करण्यात आला होता़  आता मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्याच्याविरोधात आणखी एक प्रथम माहिती अहवाल (एफ आयआर) दाखल करण्यात आला आह़े
ईडीने फत्ता याला चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना दिली होती़  त्यानुसार बुधवारी त्याची चौकशी करण्यात आली़  मात्र अधिक तपासासाठी त्याला पुन्हा बोलाविण्यात येणार आह़े  
फत्ता हा सूरतमधील व्यापारी असून त्याने तपासामध्ये कोणतेही सहकार्य केलेले नाही़  तसेच ईडीकडून त्याला निर्दोषत्व प्रमाणपत्रही देण्यात आलेले नाही़  परदेशातून हिरे आयात केल्याची खोटी देयके दाखवून देशाबाहेर पैसे पाठविल्याच्या आरोपाखाली त्याला सूरतमधून २१ मे रोजी अटक करण्यात आली आह़े  सोमवारी काँग्रेसकडून फत्ता आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे एकत्रित छायाचित्र प्रसिद्ध करून खळबळ उडवून दिली होती़  परंतु, भाजपने मात्र मोदींचे फत्ता यांच्याशी कोणतेही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होत़े