नवी दिल्ली : काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘नॅशनल हेराल्ड’च्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ‘हेराल्ड हाऊस’मधील यंग इंडिया कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकल्यानंतर चौकशीची चक्रे वेगाने फिरू लागल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून राजकीय तणावही वाढू लागल्याचे पाहायला मिळाले.

‘ईडी’ने मंगळवारी ‘हेराल्ड हाऊस’वर छापे टाकले होते, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी यंग इंडियाचे कार्यालय पूर्वपरवानगीशिवाय न उघडण्याचा आदेशही काढला. ‘हेराल्ड हाऊस’वर झालेल्या कारवाईनंतर काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची शक्यता लक्षात घेऊन ‘हेराल्ड हाऊस’सह अकबर रोडवरील काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे ‘दहा जनपथ’ निवासस्थान तसेच, शेजारी असलेल्या काँग्रेसच्या मुख्यालयाभोवती पोलीस बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली. अकबर रोडच्या लगत असलेल्या सर्व रस्त्यांचीही नाकाबंदी करण्यात आली. काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख व खासदार जयराम रमेश यांनी, काँग्रेस मुख्यालयाला गराडा घातला असून छावणीचे स्वरूप आल्याची टीका केली व पोलिसांच्या नाकाबंदीची चित्रफीतही समाजमाध्यमांतून प्रसारित केली.

‘ईडी’च्या कारवाईमुळे राजकीय घडामोडींनाही वेग आला. सोनिया गांधींच्या निवासस्थानाभोवती पोलिसांचा फौजफाटा दिसू लागताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पक्षाच्या मुख्यालयात दाखल झाले. त्यामध्ये मल्लिकार्जुन खरगे, पी. चिदंबरम, दिग्विजय सिंह, सलमान खुर्शीद आदी नेत्यांनी बैठक घेऊन केंद्र सरकार व भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी बुधवारी सकाळच्या सत्रात लोकसभेत थेट अध्यक्षांच्या समोरील मोकळय़ा हौदात येऊन केंद्र सरकारविरोधात निदर्शने करत होत्या. काँग्रेस सातत्याने विरोधी नेत्यांच्या ‘ईडी’ चौकशीविरोधात संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी कर्नाटक दौऱ्यावर गेले होते, रात्री उशिरा ते दिल्लीत परत येणार असल्याचे सांगण्यात आले.

मोदींच्या निवासस्थानाला शुक्रवारी घेराव

लगबगीने झालेली ‘ईडी’ची कारवाई ही बेरोजगारी आणि महागाईवरील काँग्रेसच्या नियोजित निषेध मोर्चापासून लक्ष विचलित करण्याचा डाव असल्याची टीका नेते अजय माकन यांनी केली. महागाई व बेरोजगारी विरोधात काँग्रेस शुक्रवारी ५ ऑगस्ट रोजी देशव्यापी आंदोलन करणार आहे. दिल्लीमध्ये काँग्रेसचे खासदार संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढतील. काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य व ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाला घेराव घालतील, असेही माकन म्हणाले.

भाजपवर टीका..

काँग्रेसविरोधात केंद्र सरकार दबाव वाढवत असल्याचे दिसू लागताच, काँग्रेसने तातडीने पत्रकार परिषद घेत केंद्र व भाजपचा निषेध केला. केंद्राने ‘ईडी’ला विरोधी नेत्यांविरोधात कारवाई करण्यासाठी मोकळे रान दिले असल्याची टीका काँग्रेसने केली. ‘ईडी’चे छापे म्हणजे ‘अपमान आणि धमकी’ असल्याचा दावा करून प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी भाजपच्या धमक्या काँग्रेसला गप्प करू शकत नाही, अशा शब्दांत भाजपवर टीका केली. लोकांनी बंड करू नये म्हणून त्यांना घाबरवण्याची केंद्राची खेळी आहे, असे काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. धमक्या देणारेच (भाजप) घाबरले असून ते सुडाचे राजकारण करत आहेत, अशी टीका जयराम रमेश यांनी केली.

कारवाईची चर्चा..

राहुल गांधी याचे निवासस्थान असलेल्या तुघलक रोड परिसरातही पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. दिल्ली पोलिसांनी या भागांमध्ये जमावबंदी लागू केली. या घडामोडींमुळे गांधी कुटुंबातील सदस्यांविरोधातील संभाव्य कारवाईचीही चर्चा रंगली होती. ‘’नॅशनल हेराल्ड’’ प्रकरणी सोनिया गांधी यांची तीन दिवस तर, राहुल गांधी यांची ५ दिवस चौकशी करण्यात आली आहे.