कर्नाटकमधील हिजाब प्रकरण शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. शाळेत मुलींनी शाळेच्या गणवेशातच यावं, धार्मिक वस्त्र परिधान करू नये, असा आदेश देत हिजाब प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अनेक ठिकाणी मुलींना हिजाब काढायला लावून शाळेत प्रवेश दिला जातोय. अनेक ठिकाणी लोक न्यायालयाच्या या आदेशाचा विरोध करताना दिसून येत आहेत. दरम्यान, हिजाब काढायला लावल्यामुळे आज एका महिला शिक्षिकेनं राजीनामा दिल्याचं समोर आलंय.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, कॉलेजमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हिजाब काढण्यास सांगितल्यानंतर कर्नाटकातील एका इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिकेने आज स्वाभिमान दुखावल्यानं राजीनामा दिला. तुमाकुरू येथील जैन पीयू कॉलेजमध्ये लेक्चरर असलेल्या चांदिनीने सांगितले की, ती जवळपास तीन वर्षापासून या कॉलेजमध्ये काम करत होती. परंतु तिला पहिल्यांदाच तिचा हिजाब काढण्यास सांगण्यात आले.

“मी गेल्या तीन वर्षांपासून जैन पीयू कॉलेजमध्ये काम करत आहे. मला आतापर्यंत कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागला नाही. पण काल मला मुख्याध्यापकांनी सांगितले की, मी शिकवताना हिजाब किंवा कोणतेही धार्मिक चिन्ह घालू शकत नाही. पण मी गेल्या तीन वर्षांपासून हिजाब परिधान करून विद्यार्थ्यांना शिकवत आहे. हा नवा निर्णय माझ्या स्वाभिमानाला धक्का देणारा आहे. म्हणूनच मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे,” असे चांदिनी यांनी पत्रकारांना सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाबवरील निर्बंध आणि त्यांच्या विरोधात निदर्शने यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून तणावाचे वातावरण आहे. गेल्या वर्षी सहा विद्यार्थीनींना हेडस्कार्फ घालून वर्गात जाण्यापासून रोखल्याचा आरोप केल्यावर निदर्शने सुरू झाली. त्यानंतर हा विरोध वाढला आणि अनेक महाविद्यालयांमध्ये पसरल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, आता या संपूर्ण प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत धार्मिक ओळख पटवणारी चिन्हे किंवा कपडे घालून जाण्यास मनाई करण्यात आली आहे.