बिगर काँग्रेस आणि बिगर भाजप पक्षांना तिसऱ्या आघाडीत सामावून घेण्याइतका देशात पुरेपूर राजकीय वाव आहे, असे भाकपचे नेते ए. बी. बर्धन यांनी म्हटले आहे. तिसरी आघाडी स्थापन करण्यास ११ पक्ष उत्सुक असून त्यांच्यात अनेक जण मुख्यमंत्रीही आहेत. लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यांच्यापैकी एकाचा पंतप्रधानपदासाठी विचार केला जाऊ शकतो, असेही बर्धन म्हणाले.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर सदर ११ पक्षांना बहुमत मिळाल्यास अनेक मुख्यमंत्र्यांपैकी एकाचा पंतप्रधानपदासाठी विचार होऊ शकतो. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीही गुजरातचे मुख्यमंत्रीच आहेत, असेही बर्धन यांनी येथे वार्ताहरांना सांगितले. तिसऱ्या आघाडीत आम आदमी पार्टी (आप) सहभागी होऊ शकते का, असे विचारले असता बर्धन म्हणाले की, आपचाही काँग्रेस आणि भाजपला विरोध असल्याने ही शक्यता फेटाळता येणार नाही. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय त्या पक्षाने घ्यावयाचा आहे, असेही ते म्हणाले.
लोकसभेच्या निवडणुकीला भरपूर वेळ असतानाच भाजपने नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली त्यावर बर्धन यांनी टीका केली. भारतीय घटनेत भावी पंतप्रधान अशी तरतूदच नाही, असे ते म्हणाले. काही तपास यंत्रणांनी मोदींना निर्दोष ठरविले असले तरी गुजरातमध्ये २००२ मध्ये उसळलेल्या दंगलीतील त्यांची भूमिका कोणीही विसरू शकणार नाही, असेही बर्धन म्हणाले.