भारतीय प्रशासन सेवेतील निलंबित अधिकारी दुर्गा नागपाल यांच्या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र पाठवले आहे. याप्रकरणी त्यांनी हस्तक्षेप करून त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा सोनियांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, नागपाल यांच्याबाबत अपशब्द वापरणारे समाजवादी पक्षाचे नेते नरेंद्र भाटी यांच्या विरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश सरकारने नागपाल यांचे निलंबन केल्याने टीकेची झोड उठली आहे. अधिकाऱ्यांना पक्षपाती वागणूक मिळू नये याची खबरदारी घ्यायला हवी, अशी अपेक्षा सोनियांनी पत्रात व्यक्त केली आहे. नागपाल या कर्तव्य बजावत होत्या, बेकायदेशीर गोष्टींच्या विरोधात त्या संघर्ष करत होत्या, अशी भावना जनतेत आहे. नोएडातील वाळू माफियांच्या विरोधात त्या संघर्ष करत होत्या. त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा सोनियांनी पत्रात व्यक्त केली आहे.
नागपाल यांचे निलंबन दुर्दैवी आहे, असे मत काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी व्यक्त केले. जयपूर येथे विकासाचे फायदे सामान्यांपर्यंत पोहोचायचे असतील तर मंत्री आणि अधिकारी यांच्यात समन्वय हवा, अशी सूचना त्यांनी केली.
काय घडले?
भाटींविरोधात तक्रार
उत्तर प्रदेश कृषी आयोगाचे अध्यक्ष आणि समाजवादी पक्षाचे नेते नरेंद्र भाटी यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यां नूतन ठाकूर यांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी नागपाल यांच्याबाबत अपशब्द वापरले होते. वाळू माफियांच्या विरोधात दुर्गा नागपाल यांनी जोरदार मोहीम उघडली होती. त्यानंतर संतापलेल्या भाटी यांनी गरळ ओकली होती.
नोएडा परिसरात एका धार्मिक स्थळाचे बांधकाम पाडल्याप्रकरणी नागपाल यांचे निलंबन करण्यात आले. मात्र ज्या वेळी ही घटना घडली त्या वेळी नागपाल घटनास्थळी हजर नव्हत्या, असे सूत्रांनी सांगितले. २७ जुलै रोजी कडलपूर खेडय़ात पोलीस पथक आल्यावर अध्र्या तासाने दाखल झाल्या त्यापूर्वीच हे बांधकाम पाडण्यात आले होते, असा दावाही सूत्रांनी केला.