दिल्ली प्रदूषणमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या सम-विषम प्रयोगास दिल्लीकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. चारचाकी पदरी असूनही काही जणांची विषम क्रमांकामुळे गैरसोय झाली. नववर्षांचा पहिला दिवस असल्याने नोएडा, गाझियाबाद, गुडगावमधील मोठय़ा कंपन्यांची कार्यालये बंद होती. याच भागातून दिल्लीकडे व दिल्लीतून या भागाकडे दररोज तीन ते चार लाख लोक ये-जा करतात. परंतु सुट्टीमुळे रस्त्यावर तुरळक वाहतूक होती. शनिवार व रविवारमुळे सम-विषम प्रयोगाचे दृश्य परिमाण लागलीच दिसणार नाहीत. सोमवारपासून खऱ्या अर्थाने या प्रयोगाची व्यवहार्यता लक्षात येईल, अशा प्रतिक्रिया सामान्यांमधून उमटल्या. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वत: विषम क्रमांकाच्या कारमधून समूह प्रवास (कार पूलिंग) करून सकारात्मक संदेश दिला. दिल्ली परिवहन महामंडळाचे संचालक आर. के. गर्ग व परिवहनमंत्री गोपाल रॉय यांनी बसमध्ये प्रवास केला.
कनॉट प्लेस, इंडिया गेट ‘गोल चक्कर’ या सदैव गजबजलेल्या भागात विषम क्रमांकांच्या चारचाकी रस्त्यावर दिसत होत्या. सम-विषम क्रमांकांमुळे एरव्ही वाहतूक कोंडी होणाऱ्या आयटीओ भागात वाहनांची संख्या कमी होती. आयटीओ भागात नियम मोडणाऱ्यांना दंड आकारण्यात आला. पोलिसांच्या मते प्रत्येक नागरिकाला सम-विषम प्रयोगाची माहिती मिळाली आहे. त्यातील नियमदेखील लोकांना माहिती आहेत. त्यानंतरही काही सम क्रमांकांची वाहने रस्त्यावर दिसत होती. हे प्रमाण दहापैकी एक असे होते.
दिल्लीत चार दशकांपासून राहणारे व दिल्ली विकास प्राधिकरणाचे (नियोजन) निवृत्त आयुक्त पी. एस. उत्तरवार म्हणाले की, सम-विषम प्रयोगाचे दृश्य परिमाण लागलीच दिसणार नाहीत. विशेष म्हणजे यामुळे प्रदूषण कमी झाले नाही. सुट्टीमुळे कमी वाहने रस्त्यावर आली. परंतु या प्रयोगामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्यांची संख्या निश्चितच वाढली आहे. काही ठिकाणी लोकांनी कार पूलिंग केले. ही एक सकारात्मक बाब आहे.
अंमलबजावणीत कसोटी
राज्य व पोलीस प्रशासनाची सम-विषम प्रयोगाच्या यशस्वितेसाठी कसोटी लागली आहे. पोलीस व आम आदमी पक्षात या प्रयोगाच्या अंमलबजावणीवरून संघर्ष होण्याची भीती पहिल्या दिवशी फोल ठरली. ‘आप’ने लोकजागृतीसाठी दहा हजार स्वयंसेवक जागोजागी तैनात केले आहेत. या स्वयंसेवकांकडून कुणालाही त्रास झाल्याचे वृत्त नाही. दिल्ली पोलिसांच्या दोनशे गटांनी जागोजागी या नियमाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेतली. परिवहन मंडळाने सुमारे तीन हजार बसेस खरेदी केल्या आहेत.