“बेरोजगारी, कमी पगार, झुंडबळीच्या घटना, काश्मीरमध्ये टाळेबंदी, सद्य स्थितीत असलेल्या नोकऱ्या संपण्याची भीती आणि विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात डांबणं हे मुद्दे सोडले तर देशात सगळं काही छान चाललं आहे” असं खोचक ट्विट माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केलं आहे. पी. चिदंबरम यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हे ट्विट करण्यात आलं आहे. पी. चिदंबरम यांनी त्यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करण्याची मुभा दिली आहे. त्यांचे कुटुंबीय चिदंबरम यांचं म्हणणं ट्विटरवर मांडू शकतात. आजच सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तिहार या ठिकाणी जाऊन पी. चिदंबरम यांची भेट घेतली. त्यानंतर हे ट्विट करुन पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

तसेच आज सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी जी भेट घेतली त्यावरही पी चिदंबरम यांनी भाष्य केलं आहे. ” आज सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तिहार तुरुंगात येऊन माझी भेट घेतली. जोपर्यंत काँग्रेस पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम आहे तोपर्यंत मी पण हिंमत हरणार नाही ” या आशयाचं ट्विटही पी. चिदंबरम यांनी केलं आहे.

आयएनएक्स मीडियातील घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने पी. चिदंबरम यांना अटक केली होती. २१ ऑगस्ट रोजी सीबीआय आणि ईडीनेही कारवाई केली होती. त्यानंतर त्यांना सीबीआय कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. महिनाभरापासून चिदंबरम तुरूंगात असून, गेल्या आठवड्यातच दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे.