नवी दिल्ली : ‘भारत आणि चीनमध्ये संबंध सुधारण्यासाठी राजकीय, राजनैतिक, लष्करी अशा विविध पातळ्यांवर घोषणा करण्यात आल्या आहेत. दोन्ही देशांनी सीमावादावरील चर्चा पुढे नेणे स्वागतार्ह बाब आहे,’ अशी भावना माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी व्यक्त केली. एका कार्यक्रमात ते बोलत होते.
‘आपण उचललेल्या सकारात्मक पावलांना चीनही तसाच प्रतिसाद देईल, अशी आशा आहे.’ भारत आणि चीनने संबंध सुधारण्यासाठी सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त प्रयत्न, सीमेवरून व्यापाराला चालना, गुंतवणुकीत वाढ, दोन्ही देशांत थेट विमानसेवा अशा विविध घोषणा केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, ‘चीनबरोबरील संबंध सुधारण्यासाठी झालेल्या घोषणा या कुठल्याही आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे निर्माण झालेल्या दबावामुळे केल्या गेलेल्या नाहीत.
भारताला चीनबरोबर कायमच चांगले संबंध हवे आहेत. गेल्या काही आठवड्यांमध्ये आपले चीनबरोबरील संबंध सुधारत आहेत. विविध उपक्रमांची घोषणा करण्यात येत आहे. सीमावादावरील चर्चेतही आपण पुढे जात आहोत, ही बाब स्वागतार्ह आहे.’ ‘२०२० नंतर दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने होते. परराष्ट्रमंत्र्यांनी अशा प्रकारे सैन्य असल्याच्या स्थितीमुळे सावधगिरी बाळगण्यास सांगितले होते. अशी परिस्थिती दोन्ही देशांच्या हिताची नाही. लवकरात लवकर यातून पुढे जायला हवे. संबंधांमध्ये चढ-उतार होत असतात. दोन्ही देशांतील संबंध भविष्यात सुधारतील अशी आशा आहे. ’