सैनिकांना दिल्या जाणाऱ्या अन्नाबाबत तक्रार करणारा व्हिडीओ समाजमाध्यमांवर पोस्ट केल्याबद्दल २०१७ साली बडतर्फ करण्यात आलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका जवानाने लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणशी मतदारसंघातून लढण्याचे ठरवले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मी वाराणशी मतदारसंघातून निवडणूक लढवीन, असे तेजबहादूर यादव याने शुक्रवारी हरयाणातील रेवाडी येथे पत्रकारांना सांगितले.

सैन्यदलातील भ्रष्टाचार हटवण्यासाठी निवडणूक लढण्याची माझी इच्छा आहे. मी भ्रष्टाचाराचा मुद्दा उठवला होता, पण मला सेवेतून काढून टाकण्यात आले, असे यादव म्हणाला.

जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेनजीकच्या बर्फाळ आणि पर्वतीय प्रदेशात जवानांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या निकृष्ट दर्जाबद्दल तक्रार करणारा व्हिडीओ यादव याने २०१७ साली समाजमाध्यमांवर टाकला होता. यानंतर बेशिस्तीच्या आरोपाखाली त्याला बडतर्फ करण्यात आले होते.

‘कप’प्रकरणी निवडणूक आयोगाची रेल्वेला नोटीस

‘मै भी चौकीदार’ अशी घोषणा असलेले कागदाचे चहाचे कप वापरल्याबद्दल निवडणूक आयोगाने (ईसी) रेल्वेला नव्याने कारणे-दाखवा नोटीस बजावली असल्याचे वृत्त आहे. मै भी चौकीदार अशी घोषणा असलेल्या चहाच्या कपाचे चित्र एका प्रवाशाने ट्वीट केल्यानंतर व्हायरल झाले, त्यानंतर अशा प्रकारच्या कपांचा वापर थांबविण्यात आला आणि कंत्राटदाराला दंड ठोठावण्यात आला, असे रेल्वेने म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रथमदर्शनी हा आचारसंहितेचा भंग असल्याचे दिसत असून त्याबद्दल निवडणूक आयोगाने रेल्वेला स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. मै भी चौकीदार असे लिहिलेल्या कपातून चहा देण्यात आल्याच्या वृत्ताची चौकशी करण्यात येत आहे, त्यासाठी आयआरसीटीसीची पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती, निरीक्षक आणि खान-पान सेवा प्रभारींकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. सेवापुरवठादाराला एक लाखाचा दंड ठोठावण्यात आला असून त्याच्यावर कारणे-दाखवा नोटीसही बजावण्यात आल्याचे आयआरसीटीसीने म्हटले आहे.