निवडणुका आल्यावर पक्षांतर्गत गटबाजी, झिंदाबाद, मुर्दाबाद, मारामाऱ्या, परस्परांची तिकिटे कापणे हे प्रकार साऱ्याच राजकीय पक्षांमध्ये होतात. शिस्तप्रिय समजल्या जाणाऱ्या भाजप कार्यालयाची कार्यकर्त्यांनी उत्तराखंडमध्ये तोडफोड केली. उत्तर प्रदेशात उमेदवारीवरून वाद सुरू आहेत. तेथे पक्षाध्यक्ष अमित शहा यांची प्रतिमा जाळण्यापर्यंत कार्यकर्त्यांची मजल गेली. काँग्रेस पक्षाचे सारे गुण आता भाजपमध्येही येऊ लागले आहेत. केंद्रात सत्ता असल्याने तसेच सध्या वातावरण अनुकूल असल्यामुळे भाजपमध्ये स्पर्धा वाढणे समजू शकते. मुंबईत काँग्रेसला फार काही यशाची अपेक्षा नाही. शिवसेना आणि भाजपमधील वादात काँग्रेसचा कितपत निभाव लागेल, याबाबत साशंकता आहे. तरीही काँग्रेसमधील गटबाजी आणि संघर्ष सुरू झाला आहे. मुंबईत काँग्रेसला नेहमीच गटबाजीचा शाप लागला आहे. मुरली देवरा यांच्या एकहाती वर्चस्वाला गुरुदास कामत यांनी आव्हान दिले. कामतांकडे सूत्रे आल्यावर कृपाशंकर सिंह आणि अन्य मंडळी सक्रिय झाली. पुढे कृपाशंकर सिंह अध्यक्ष झाल्यावर कामत गटाने उचल खाल्ली. आता निरुपम आणि कामत असा संघर्ष सुरू आहे. निरुपम यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे प्रचारात सहभागी होणार नाही, असे कामत यांनी जाहीर करून टाकले. या वादाच्या पाश्र्वभूमीवर दुरुस्ती करण्याकरिता काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांना निरीक्षक म्हणून पाठविले. हे हुड्डा म्हणजे एक नंबरचे टग्गे. सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारावे म्हणून आग्रह धरणाऱ्यांमध्ये आघाडीवर असणारे व तशी घोषणाबाजी केल्याचे बक्षीस म्हणून भजनलाल यांचा पत्ता कापून काँग्रेसने हुड्डा यांचे नेतृत्व पुढे केले. सोनियांचे जावई रॉबर्ट वढेरा यांना जमीन खरेदीसाठी हुड्डा यांनी मुख्यमंत्री असताना मदत केली होती. यामुळेच हुड्डा यांचे महत्त्व साहजिकच वाढले. प्रदेशाध्यक्ष अशोक तन्वर यांना मारहाण करण्यापर्यंत हुड्डा यांची मजल गेली. एवढे करूनही त्यांचे कोणी वाकडे करू शकत नाही. हे हुड्डा मुंबईत आले आणि त्यांनी आढावा घेतला. वाद घालू नका, उमेदवारीवरून वाद असल्यास मी लक्ष घालेन वगैरे आश्वासने पक्षाच्या नेत्यांना दिली. ‘मते अनेक, पण काँग्रेस एक’ असा नाराही दिला. हे सारे होत असताना तिकडे गुरुदास कामत माघार घेण्यास अजिबात तयार नाहीत. राहुल गांधी यांनी कामत आणि निरुपम यांच्यात समेट घडविण्याचा मागे केलेला प्रयत्न यशस्वी झाला नव्हता. तर हुड्डा यांच्या प्रयत्नांना कितपत यश मिळेल याबाबत साशंकताच आहे. हुड्डा आले आणि गेले.. काँग्रेसमधील वाद कायमच आहेत.