Ex Nepal PM wife burnt alive after gen Z protesters saet his house on fire : नेपाळमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. ‘जेन-झी’नी सरकारविरोधात सोमवारी सुरू केलेल्या निदर्शनांनी मंगळवारी अधिकच उग्र स्वरूप धारण केले, ज्यानंतर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे. या आंदोलनावेळी संतप्त निदर्शकांनी नेपाळच्या पार्लमेंटसह अनेक महत्त्वाच्या इमारतींची जाळपोळ केली.

माजी पंतप्रधानांचे घर पेटवले

निदर्शकांनी नेपाळचे माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या घरावर देखील हल्ला केला. यावेळी नासधूस करून घर पेटवून देण्यात आले. यावेळी घरात अडकलेल्या खनाल यांच्या पत्नी राज्यलक्ष्मी चित्रकर याचा आगीत होरपळू गंभीर जखमी झाल्या, ज्यानंतर त्यांचे मंगळवारी निधन झाले, असे वृत्त माध्यमांनी दिले आहे. नेपाळची राजधानी काठमांडूच्या दल्लू भागात हा धक्कादायक प्रकार घडला. चित्रकर यांना तातडीने किर्तीपूर बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असे कुटुंबीयांनी सांगितले. एनडीटीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे घर देखील आंदोलकांनी पेटवून दिले. सोशल मीडियावर काही काळासाठी घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधातील आंदोलनाने अत्यंत हिंसक वळण घेतले. यावेळी ओली यांच्या सरकारमधील अर्थमंत्री बिष्णू प्रसाद पौडेल (६५) यांना देखील नेपाळच्या राजधानीत रस्त्यावर मारहाण करण्यात आली, याचा अत्यंत भयानक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली जात असल्याचे दिसून येत आहे.

समाज माध्यमांवर बंदी घातल्यानंतर संतप्त झालेल्या तरुणांनी निदर्शने करण्यास सुरू केली आणि त्यांनी देशाच्या राजधानीचा ताबा घेतला. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १९ जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले आहेत.

सोमवारी रात्री समाज माध्यमांवरील बंदी उठवण्यात आली मात्र निदर्शने सुरूच राहिली. भडकलेल्या आंदोलकांनी नेपाळच्या काही वरिष्ठ नेत्यांची घरे आणि नेपाळची पार्लमेंट देखील पेटवली. यादरम्यान काठमांडू येथील विमानतळ देखील बंद करण्यात आला, त्यानंतर लष्कराच्या हेलिकॉप्टर्सनी काही मंत्र्‍यांना सुरक्षित स्थळी पोहचवले.