पुढीलवर्षी पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसने आपला निवडणूक जाहीरनामाही तयार केला असून माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण केले जाणार आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार काँग्रेस मनमोहनसिंग यांना स्टार प्रचारक म्हणून निवडणुकीच्या रणांगणात उतरवले जाऊ शकते. मनमोहनसिंग यांच्या स्वच्छ प्रतिमेचा फायदा पक्षाला मिळू शकतो असा विश्वास पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना वाटतो. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांना काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष केले आहे. काँग्रसेने निवडणूक सल्लागार प्रशांत किशोर यांच्याकडे पंजाबमधील निवडणूक प्रचाराची जबाबदारी सोपवली आहे.
प्रशांत किशोर यांनी सध्या राज्यात ‘हल्के विच कॅप्टन’ आणि ‘कॉफी विथ कॅप्टन’ सारखे अभियान सुरू केले आहे. अद्याप पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हे पंजाबच्या प्रचारात सक्रिय झालेले नाहीत. उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीवर राहुल गांधी लक्ष केंद्रीत केले आहे. सध्या उत्तर प्रदेशमध्ये ‘किसान यात्रा’ व ‘खाट सभा’ अभियान सुरू आहे.
सत्तेत पुन्हा येण्यासाठी काँग्रेसने दलित मतांवर लक्ष केंद्रीत केले आहे. पंजाबमध्ये ३१ टक्के लोकसंख्या दलित तर ७ टक्के ख्रिश्चन समुदायाचे लोक आहेत. त्यामुळे काँग्रेसची या दोन वर्गांवर नजर आहे. कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी तर ख्रिश्चन समुदायासाठी काही योजनाही जाहीर केल्या आहेत. काँग्रेसमधील महिला आघाडीही प्रचारासाठी सक्रिय झाली आहे.
आम आदमी पक्षाने (आप) सहा महिन्यांपासूनच निवडणुकीची तयारी केली आहे. आपल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत पक्षाने पंजाबमधील चार जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे पक्षाला पंजाबमधून मोठ्या अपेक्षा आहेत. गेल्या काही दिवसांपासून पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाबमध्ये कमालीचे सक्रीय झाले आहेत. परंतु पक्षातील नेत्यांवर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे आरोप होत असल्यामुळे समस्याही वाढल्या आहेत.
निवडणुकीत भाजपचे माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे. सिद्धू यांनी माजी हॉकी खेळाडू आणि शिरोमणी अकाली दलाचे आमदार परगत सिंग व इतर सहकाऱ्यांबरोबर आवाज ए पंजाब नावाची संघटना स्थापन केली आहे. सिद्धू यांनी अद्याप कुठल्या राजकीय पक्षाची स्थापना केलेली नाही. ते चौथी आघाडी स्थापन करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.