परदेशातील एचएसबीसीमध्ये खाते असलेल्या भारतीयांची संख्या आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीच्या दुप्पट असून, या खातेधारकांच्या खात्यांमध्ये २५ हजार ४२० कोटी रुपये शिल्लक असल्याची माहिती ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने केलेल्या शोध पत्रकारितेतून पुढे आली आहे. या नव्या माहितीमुळे परदेशातील बॅंकांमध्ये काळा पैसा दडविणाऱयांच्या तपासाची व्याप्ती आणखी रुंदावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष तपास पथकाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येतो आहे. कॉंग्रेस नेते नारायण राणे यांचे कुटुंबीय आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची सून स्मिता ठाकरे यांचेही नाव या यादीमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्यात आलेल्या या शोधाला ‘स्वीसलीक्स’ असे नावही देण्यात आले आहे.
फ्रान्स सरकारकडून २०११ मध्ये त्यांच्याकडे असलेल्या भारतीय खातेधारकांची यादी भारत सरकारला देण्यात आली होती. त्यामध्ये ६२८ नावे होती. मात्र, ‘एक्स्प्रेस’ला मिळालेल्या माहितीनुसार, ही संख्या ११९५ इतकी आहे. परदेशातील बॅंकांमध्ये पैसा ठेवणारे भारतीय किती आहे, हे शोधण्यासाठी ‘एक्स्प्रेस’ने तीन महिन्यांची मोहीमच राबविली. यासाठी वॉशिंग्टनस्थित ‘इंटरनॅशनल कॉन्सॉर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट’ (आयसीआयजे) आणि पॅरिसस्थित ‘ला मॉंड’ या दैनिकाची साथ घेण्यात आली.
‘एक्स्प्रेस’ला मिळालेल्या माहितीनुसार, या यादीमध्ये देशातील नामांकित उद्योगपती, हिरेव्यापारी, राजकारणी आणि अनिवासी भारतीय यांचा समावेश आहे. देशातील मोठ्या उद्योगपतींची एचएसबीसीमध्ये खाती आहेत. त्यामध्ये मुकेश अंबानी, अनिल अंबानी, आनंदचंद बर्मन, राजन नंदा, यशोवर्धन बिर्ला, चंद्रू लच्छमदास रहेजा, दत्तराज साळगावकर, भद्रश्याम कोठारी आणि श्रावण गुप्ता यांचा समावेश आहे.
राज्याचे माजी उद्योगमंत्री आणि कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्या कुटुंबियांचीही नावेही या यादीमध्ये आहेत. राणे यांची पत्नी नीलम राणे आणि मुलगा नीलेश राणे यांचा यामध्ये समावेश आहे. त्याबरोबरच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची सून स्मिता ठाकरे आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत वसंत साठे यांच्या कुटुंबियांची नावेही यादीमध्ये आहेत. केंद्रातील गेल्या यूपीए सरकारमधील मंत्री प्रणीत कौर आणि कॉंग्रेसचे माजी खासदार अन्नू टंडन यांचेही नाव यादीमध्ये असल्याचे आढळले. विशेष म्हणजे राजकारणाशी संबंधित खातेधारकांची संख्या कमी असल्याचे दिसून आले.

देशातील मोठ्या हिरेव्यापाऱयांची नावेही या यादीमध्ये आहेत. त्यापैकी बरेच जण परदेशांमध्ये स्थायिक झाले आहेत. एचएसबीसीमध्ये खात्यांवर यापैकी अनेकांचे पत्ते मुंबईतील आहेत. त्यामध्ये रसेल मेहता, अनूप मेहता, सौनक पारिख, चेतन मेहता, गोविंदभाई काकडिया आणि कुणाल शहा यांचा समावेश आहे. स्वराज पॉल, मनू छाब्रिया यांचे कुटुंबिय, राजेंद्र रुईया आणि विमल रुईया आणि नरेशकुमार गोयल या प्रमुख अनिवासी भारतीयांची नावेही या यादीमध्ये आहेत.
एचएसबीसीकडे असलेल्या भारतीय खातेधारकांपैकी २७६ खातेधारकांच्या खात्यांमध्ये दहा लाख डॉलरची माया आहे. यापैकी ८५ खातेदार हे देशात राहात असल्याचेही आढळले आहे