थायलंडची राजधानी बँकॉक शहरात निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अनेक स्फोट झाले तसेच गोळीबाराच्या घटना घडल्या. विरोधी कार्यकर्त्यांनी रविवारी होणारी निवडणूक हाणून पाडण्यासाठी प्रयत्न केले, त्यात सात जण जखमी झाले आहेत.
राजकीय विरोधकांनी एकमेकांवर पिस्तुलांनी हल्ले केली, कडक सुरक्षा असतानाही विरोधकांनी रविवारी होणारी निवडणूक उधळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. किमान दोन लाख सुरक्षा जवान तैनात करण्यात आले असताना लक साय भागात चकमकी झाल्या असून पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोलोटोव कॉकटेलचे दोन स्फोट झाले. तासभर गोळीबार सुरू होता व त्यात सहा नागरिक जखमी झाले. त्यात एक वार्ताहर व अमेरिकी छायाचित्र पत्रकार जेम्स नॅशवे यांचा समावेश आहे.
हिंसाचाराने घाबरलेल्या लोकांनी मॉल, रस्त्याच्या बाजूचे पूल यावर आसरा घेतला व वाहनांमागे लपून बसले. निदर्शकांनी बँकॉक येथे मोर्चा काढून मतपेटय़ा ठेवलेल्या इमारतीला वेढा दिला, तिथे पंतप्रधान यिंगलुक शिनावात्रा यांना पुन्हा सत्तेवर येण्यापासून रोखण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. एकूण ४९ दशलक्ष मतदार मतदानासाठी पात्र असून पोलिस व लष्करी अधिकारी यांनी ९३,००० मतदान केंद्रांना सुरक्षा दिली आहे. सैन्यदलांच्या २७ कंपन्या पोलिसांना मदत करण्यासाठी तैनात केल्या आहेत. जे लोक मतदान करू इच्छितात त्यांना ते करता यावे यासाठी संरक्षण दिले आहे, असे सेंटर फॉर मेंटेनिंग पीस अँड ऑर्डर या संस्थेचे संचालक चालेर्म युबामरूंग यांनी सांगितले. चार्लेम हे कामगारमंत्रीही असून त्यांनी बँकॉक व आसपासच्या भागात गेल्या आठवडय़ात ६० दिवसांची आणीबाणी जाहीर केली आहे. या निवडणुका घटनाबाह्य़ असल्याचा विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचा दावा यिंगलक यांनी शनिवारी फेटाळला असून निवडणुकीतील नियम २००७ मध्ये डेमोक्रॅटिकप्रणीत सरकारनेच बदलले होते, प्रशासनाने नाही त्यामुळे घटनाबाह्य़ कशाला म्हणता, असा प्रतिप्रश्न शिनावात्रा यांनी केला.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Feb 2014 रोजी प्रकाशित
निवडणुकीच्या पूर्वसंध्येला बँकॉकमध्ये हिंसाचार
थायलंडची राजधानी बँकॉक शहरात निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अनेक स्फोट झाले तसेच गोळीबाराच्या घटना घडल्या.
First published on: 02-02-2014 at 02:49 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explosions firing in bangkok on eve of polls seven injured