उत्तर इराकमधील कोचो गावात ८० याझिदींचे शिरकाण करणाऱ्या ‘आयसिस’ दहशतवाद्यांचा जगभरातून निषेध केला जात आहे. तसेच या दहशतवाद्यांना होणारा वित्तपुरवठा बंद व्हावा आणि त्यांच्याविरोधात लढणाऱ्या कुर्दी लोकांना शस्त्रास्त्रे देण्यात यावी, यासाठी पाश्चिमात्य राष्ट्रांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
शुक्रवारी दुपारी कोचो गावात आयसिसच्या दहशतवाद्यांनी थैमान घातले. या गावातील तब्बल ८० पुरुषांची निर्घृण हत्या करण्यात आली. या भीषण हल्ल्यातून बचावलेले याझिदी आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत होते. शनिवारी सकाळी हे वृत्त आणि हल्ल्याचा तपशील जाहीर झाल्यानंतर, पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली.
या हत्याकांडाचा निषेध करतानाच ब्रिटनने इराकवरील हवाई टेहळणी अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले, तर अनेक पाश्चिमात्य राष्ट्रांनी दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठा रोखण्यासाठी पावले उचलली आहेत.
अमेरिकेने ८ ऑगस्टपासून दहशतवाद्यांविरोधात हवाई हल्ले सुरू केले होते. त्याचा सूड दहशतवाद्यांनी आपल्यावर उगवल्याचा दावा कोचो गावातील हत्याकांडातून बचावलेले याझिदी करीत आहेत.
गेल्या ३ ऑगस्टपासून दहशतवाद्यांच्या कारवायांना ऊत आला असून त्यांनी हजारो ख्रिश्चन, याझिदी आणि तुर्की अल्पसंख्याकांना ओलीस ठेवले असल्याचा आरोप अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने केला आहे, तर संयुक्त राष्ट्रांनी शक्य ते सर्व उपाय योजून जिहादी शक्तींना खिळखिळे करण्याचा ठराव मंजूर केला आहे. तसेच सर्वच देशांनी दहशतवाद्यांना होणारा सर्व प्रकारचा पुरवठा कसा थांबेल यासाठी सर्वतोपरी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन सर्व देशांना करण्यात आले आहे.युरोपीय महासंघातर्फे ब्रसेल्स येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दहशतवाद्यांविरोधात लढणाऱ्या कुर्दीना शस्त्रास्त्रपुरवठा कसा करता येईल, यावर या बैठकीत खल करण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Aug 2014 रोजी प्रकाशित
दहशतवाद्यांकडून ८० इराकी निरपराध्यांचे शिरकाण
उत्तर इराकमधील कोचो गावात ८० याझिदींचे शिरकाण करणाऱ्या ‘आयसिस’ दहशतवाद्यांचा जगभरातून निषेध केला जात आहे.
First published on: 17-08-2014 at 02:23 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extremists killed 80 yazidi in iraq