पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारपासून दोन दिवसाच्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. बांगलादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शुक्रवारी मोदी सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदी यांनी १९७१ च्या बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. ढाक्यापासून ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या सावर येथे शहिदांच्या राष्ट्रीय स्मारकावर मोदी यांनी पुष्पचक्र वाहिले. यावेळी भाषण करताना मोदींनी आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केल्याचं म्हटलं. मात्र आता मोदींच्या या दाव्यावरुन अनेक विरोधकांनी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पंतप्रधान मोदीं यांनी खोटा दावा केल्याचा आरोप ट्विटरवरुन अनेकांनी केला आहे. असं असलं तरी पंतप्रधान मोदी यांनीच लिहिलेल्या पुस्तकामध्ये बांगलादेश स्वातंत्र्य युद्धाच्या वेळी त्यांनी केलेल्या आंदोलनाचा उल्लेख सापडतो.

मोदी नक्की काय म्हणाले?

सावर येथील भाषणामध्ये मोदींनी बांगलादेश स्वातंत्र्यासाठी केलेलं आंदोलन आणि अटकेचा उल्लेख केला. “मी बांगलादेशातील बंधू, भगिनींना आणि येथील तरूण पिढीला अभिमानाने आठवण करून देऊ इच्छितो की, बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणे, हे माझ्या आयुष्यातील पहिल्या आंदोलनांपैकी एक होतं. माझे वय २०-२२ वर्ष असेल जेव्हा मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी बांगलादेशला स्वातंत्र्य मिळावं यासाठी सत्याग्रह केला होता. तेव्हा मला अटकही झाली होती व तुरूंगात जाण्याचीही वेळ आली होती,” असं मोदी म्हणाले.

पुस्तकात आहे उल्लेख

मोदींच्या या वक्तव्यानंतर सोशल नेटवर्किंगवर चांगलेच आरोप प्रत्यारोप झाल्याचं चित्र पहायला मिळालं. अनेक विरोधकांनी मोदी या आंदोलनात कसे होते यासंदर्भात प्रश्न उपस्थित करणारे हजारोंच्या संख्येने ट्विट केले. न्यूज १८ ग्रुपचे कार्यकारी संपादक असणाऱ्या ब्रिजेश कुमार सिंग यांनी मात्र मोदींचा हा दावा खरा असल्याचं ट्विट केलं आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेशच्या निर्मितीसाठी सत्याग्रह केला आणि त्यासाठी तुरुंगात जावं लागल्याचा उल्लेख आज ढाक्यामध्ये केला. त्यानंतर त्यांच्या टीकाकारांच्या पोटात दुखू लागलं आहे. या संदर्भात संभ्रम निर्माण करणारं वातावरण तयार केलं जात आहे. यावरुन टीका करणाऱ्यांना १९७८ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचं शेवटचं पान पाहून निराश व्हावं लागेल,” असं म्हणत सिंग यांनी एका पुस्तकाचे दोन फोटो ट्विट केलेत.

सिंग यांनी पोस्ट केलेलं पुस्तक हे मोदींनी लिहिलेलं पुस्तक असून त्यामध्ये मोदींनी गुजरातमधील वेगवेगळ्या संघर्षामधील आपले अनुभव कथन केले आहेत. या पुस्तकाच्या बॅक कव्हरवरील मजुकारचे भाषांतर, “आणीबाणीचे २० महिने, सरकारी कामकाजाचे अपयश सिद्ध करत भूमिगत चळवळीच्या माध्यमातून काम केलं आणि स्वत:मधील संघर्ष करण्याची वृत्ती कायम ठेवली. यापूर्वी आम्ही बंगलादेशच्या सत्याग्रहाच्या वेळी तिहार तुरुंगामध्ये जाऊन आलो,” असं असल्याचं सिंग यांनी म्हटलं आहे.

मोदींनी केलेला दावा योग्य आहे सांगण्यासाठी आणखीन एक गोष्ट सध्या पुरावा म्हणून व्हायरल होत आहे. जर संपूर्ण भारतच बांगलादेशला स्वातंत्र्य मिळावा या मताचा होता तर सत्याग्रह कोणाविरोधात झाला असा प्रश्न विचारणाऱ्यांना या सत्याग्रहाचा उल्लेख माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना बांगलादेशने दिलेल्या पुरस्काराच्या वेळी वाजपेयी यांच्या योगदानासंदर्भात दिलेल्या माहितीमध्ये भारतात बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या सत्याग्रहाचा उल्लेख आहे. बांगलादेश सरकारला भारताने पाठिंबा द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. यावेळी भारताने तातडीने यासंदर्भात बांगलादेशला पाठिंबा जाहीर करावा या मागणीसाठी जनसंघाने आंदोलन केलं होतं. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संसदेसमोर १ ते ११ ऑगस्ट १९७१ दरम्यान आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर १२ ऑगस्ट रोजी वाजपेयी यांनी राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर कठोर भूमिका घेत बांगलादेशच्या निर्मितीला पाठिंबा असल्याचं ठामपणे सांगितलं.

दरम्यान, मोदींनी केलेल्या या दाव्यामुळे भाजपा समर्थक आणि विरोधक आमने सामने आल्याचं चित्र पहायला मिळत आहे.