राजस्थानच्या बुंदी तालुक्यातील हिंडोली या छोट्या शहरात ४० पक्की घरे आणि ३० चारचाकी वाहने आहेत. या एकाच वाक्यातून या गावातील समृद्धीची कल्पना येऊ शकते. मात्र समृद्धी नांदत असलेल्या या गावातील लोकांना स्वच्छता आणि आरोग्याची काडीचीही चिंता नाही. त्यामुळेच गावात पक्की घरे, चारचाकी वाहने आणि इतर सोयी सुविधा असूनही शौचालये नाहीत. या गावातील एका घरापुढे तर १५ गाड्या उभ्या राहतात. मात्र या घरातील सर्व मंडळींना शौचासाठी बाहेरच जावे लागते.

हिंडोली गावची लोकसंख्या ३०० इतकी आहे. याच गावात घासी लाल नाथ यांचे कुटुंब राहते. घासी लाल नाथ आणि त्यांचे कुटुंबीय पक्क्या घरात राहतात. त्यांच्या घरात सर्व सुख सोयी उपलब्ध आहेत. मात्र या घरातील सर्व सदस्य उघड्यावरच शौचाला जातात. याबद्दल घरातील महिलांनादेखील कोणताही आक्षेप नाही. ‘आमच्याकडे शौचालय बांधण्यासाठी पैसे नाहीत. मात्र आम्ही घरात लवकरच शौचालय बांधण्याचा विचार करत आहोत,’ असे घासी लाल नाथ यांनी सांगितले. यावेळी शौचालय बांधण्यासाठी सरकारकडून अनुदान मिळत असल्याची माहिती त्यांना सांगण्यात आली. मात्र शौचालय बांधणाऱ्या गावातील इतर लोकांना अशा प्रकारेच कोणतेही अनुदान न मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

हिंडोली गावातील फक्त १६ घरांमध्ये शौचालये आहेत. मात्र यापैकी कोणालाही शौचालय बांधणीसाठी सरकारकडून दिले जाणारे १५ हजार रुपयांचे अनुदान मिळालेले नाही. ग्रामीण भागातील अधिकाधिक लोकांनी घरात शौचालय उभारावे, यासाठीअनुदान दिले जाईल, अशी घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र यासाठीचे अनुदान ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नसल्याने शौचालय बांधण्यासाठी लोक फारसा पुढाकार घेताना दिसत नाहीत.

हिंडोली गावातील अनेकांना अद्याप केंद्र सरकारकडून १५ हजारांचे अनुदान मिळालेले नाही. ‘चित्तर लाल सुवालका आणि नाथूजी महाराज यांनी त्यांच्या घरात शौचालये बांधून घेतली. याबद्दलची आवश्यक कागदपत्रेदेखील त्यांनी जमा केली. याबद्दल पंचायत समितीमध्ये जमा करण्यात आलेले प्रमाणपत्र एकदा गहाळ झाले. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा प्रमाणपत्र पंचायत समितीत जमा केले. याला दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र अद्याप तरी सरकारकडून कोणताही कोणतेही अनुदान मिळालेले नाही,’ असे ग्रामस्थ पुष्कर सुवालका यांनी सांगितले.

‘एका शौचालयाच्या उभारणासाठी २५ ते ३० हजारांचा खर्च येतो. मात्र सरकारकडून केवळ १५ हजारांचा मदत दिली जाते. त्यामुळे ही मदत पुरेशी नाही. सरकारकडून दिले जाणारे अनुदान मिळायला प्रचंड उशीर होतो,’ अशी माहिती धन्नानाथ योगी यांनी दिली. या गावातील बाबुल योगी यांनी त्यांच्या कुटुंबासाठी नुकतीच एक एसयूव्ही गाडी खरेदी केली आहे. त्यांच्याकडे आधीच ६ गाड्या आहेत. मात्र अद्याप या घरात एकही शौचालय नाही. या कुटुंबात १० सदस्य असून हे सर्वजण उघड्यावर शौचास जातात. गावातील इतर घरांमध्येदेखील अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळते.