scorecardresearch

अमेरिका-कॅनडा सीमेवर थंडीमुळे ४ भारतीयांचा मृत्यू, मानवी तस्करीशी संबंधित असल्याचा संशय

हे चौघेही सीमेजवळच्या अमेरिकेच्या भागातून पकडण्यात आलेल्या एक गटातले होते. चारही मृतदेह सीमेपासून ९ ते १२ मीटरच्या अंतरावर आढळून आले आहेत.

कॅनडा-अमेरिका सीमा भाग (फोटो सौजन्य – मॅनटोबा रॉयल कॅनेडियन माऊंटेड )

अमेरिकेच्या लगत असलेल्या कॅनडाच्या सीमेवर झालेल्या एका अपघातात एकाच परिवारातल्या चार सदस्यांचा गारठून मृत्यू झाला आहे. हे चौघेही भारतीय नागरिक आहेत. मृतांमध्ये एका नवजात शिशूचाही समावेश आहे. या प्रकरणाचा संबंध मानवी तस्करीशी जोडला जात आहे.

मॅनटोबा रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलिसांनी गुरुवारी सांगितलं की एमर्सन परिसराजवळ कॅनडा-अमेरिका सीमेवर कॅनडाजवळ बुधवारी चार मृतदेह सापडले आहेत, ज्यात दोन मृतदेह प्रौढ व्यक्तींचे असून एक किशोरवयीन व्यक्तीचा आणि एक नवजात शिशूचा आहे. झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की मृत्यू झालेल्या व्यक्ती भारतातून आले होते आणि कॅनडामधून अमेरिकेच्या सीमेतून आत शिरण्याचा प्रयत्न करत होते. सहायक पोलीस आयुक्त जेन मैक्लेची यांनी गुरुवारी सांगितलं, मी आज जी माहिती देणार आहे ती अनेकांना ऐकवणार नाही. ही एक खूप दुःखद घटना आहे. प्राथमिक तपासानुसार, असं वाटत आहे की या सर्वांचा मृत्यू गारठल्याने झालेला आहे.

मैक्लेची यांनी सांगितलं की, पोलिसांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, हे चौघेही सीमेजवळच्या अमेरिकेच्या भागातून पकडण्यात आलेल्या एक गटातले होते. चारही मृतदेह सीमेपासून ९ ते १२ मीटरच्या अंतरावर आढळून आले आहे. अमेरिकी सीमा शुल्क आणि सीमा संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एमर्सन परिसरातून एक गट सीमा ओलांडून अमेरिकेत दाखल झाला आहे. एका प्रौढ व्यक्तीकडे लहान मुलाच्या काही वस्तू आहेत, मात्र या गटात कोणताही नवजात शिशू नाही.

यानंतर लगेचच सीमेच्या दोन्ही बाजूंना सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आणि दुपारी दोन प्रौढ व्यक्ती आणि एका नवजात शिशूचा मृतदेह आढळून आला. किशोरवयीन व्यक्तीचा मृतदेह मात्र काही वेळानंतर आढळला आहे. मानवी तस्करीच्या आरोपाखाली फ्लोरिडाच्या ४७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आल्याचंही स्थानिक प्रशासनाने सांगितलं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हे लोक कोणाच्या तरी मदतीने सीमेच्या पलिकडे जाण्याच्या विचारात होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांचा मृत्यू झाला. या परिसरात वारे वेगानं वाहत असून तापमान उणे ३५ अंश सेल्सियसच्या आसपास आहे. फक्त थंडीच नव्हे तर बराच काळ बर्फाळ हवा आणि अंधार यामुळेही त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी अमेरिका आणि कॅनडा सरकारकडून तात्काळ अहवाल मागवला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Family of 4 believed to be indians freeze to death while being smuggled across us canada border vsk

ताज्या बातम्या