पतीकडून मुल होत नाही म्हणून गुजरातच्या वडोदरा येथील महिलेवर सासरा आणि मेहुण्याने वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेचा गर्भपात झाल्यानंतर तिने नवापुरा पोलीस ठाण्यात सासरे आणि मेहुण्याविरोधात बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली. तसेच पतीने खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत गप्प बसण्यासाठी दबाव टाकला होता, असाही आरोप पीडितेने आपल्या तक्रारीत केला आहे.
एफआयआरमध्ये पीडितेने तिच्यावरील अत्याचाराचा घटनाक्रम सांगितला. फेब्रुवारी २०२४ मध्ये तिचे लग्न झाल्यानंतर ती पतीच्या घरी आली. लग्नाच्या काही आठवड्यानंतर तिच्या सासरच्यांनी सांगितले की, तिच्या वयामुळे ती गर्भवती राहील याची शक्यता कमी वाटते. त्यामुळे जोडप्याने प्रजननासाठी वैद्यकीय उपचार घ्यावेत, असा सल्ला घरच्यांनी दिला.
वैद्यकीय तपासणी केल्यानंतर लक्षात आले की, तिच्या पतीमध्ये कमतरता असून शुक्राणूंची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे ती गर्भवती राहण्यास अडचण येऊ शकते. वैद्यकीय सल्ल्यानुसार, पीडितेने आयव्हीएफ उपचार घेण्याचा निर्णय घेतला. मात्र तेही यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर उपचार न घेता मूल दत्तक घेण्याचा निर्णय पीडितेने कुटुंबियांना सांगितला. मात्र त्यांना तो निर्णय मान्य झाला नाही.
सासऱ्यांनी अनेकदा केला बलात्कार
जुलै २०२४ मध्ये पीडिता तिच्या खोलीत झोपलेली असताना तिच्या सासऱ्याने खोलीत प्रवेश करत बलात्कार केला, असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर सासऱ्याने मारहाणही केली. पतीला याबाबतची माहिती दिल्यानंतर पतीने मूल हवे असल्याचे सांगून तिलाच गप्पा राहण्यास सांगितले.
पतीने दिली धमकी
तसेच बलात्काराची वाच्यता बाहेर केल्यास तिचे खासगी फोटो व्हायरल करेन, अशीही धमकी पतीने दिली. सासऱ्याने अनेकवेळा तिच्यावर बलात्कार केला, तरीही ती गर्भवती राहिली नाही, असेही पीडितेने सांगितले. डिसेंबर २०२४ मध्ये तिच्या मेहुण्याने बलात्कार केला. मेहुण्याने अनेकदा बलात्कार केल्यानंतर जूनमध्ये ती गर्भवती राहिली. मात्र जुलै महिन्यात तिचा गर्भपात झाला. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर रविवारी एफआयआर नोंदविला.