‘मुस्लिम महिलांनी रिसेप्शनिस्ट होता कामा नये’, ‘दंडावर टॅटू काढण्यास परवानगी नाही’, ‘अंगावर अत्तर शिंपडणे’ हे इस्लामला मान्य नाही. दारुल उल इस्लाम तसेच अन्य इस्लामी संघटनांनी अलीकडच्या काळात घोषित करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या  तालिबानी फतव्यांमुळे देशभर नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र एखादी संस्था किंवा मौलवीकडून जारी करण्यात आलेला फतवा सर्वाना बंधनकारक नाही असे खडे बोल मुस्लिम विचारवंतांनी सुनावले आहेत.
  फतव्याचे पालन सर्व मुस्लिमांनी करणे बंधनकारक आहे, अशी समजूत आहे. मात्र बहुतांश फतवे हे त्या विशिष्ट परिस्थितीशी निगडित असतात. त्यामुळे ते सर्वाना लागू होऊ शकत नाहीत असे जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील इस्लामिक अध्ययन विभागाचे प्रमुख प्रा. अख्तरुल वासे यांनी स्पष्ट केले आहे.
काही फतवे हे म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रश्नाला दिलेले उत्तर असते. त्यामुळे त्याचे पालन करण्यापूर्वी ती परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. ‘मुस्लिम महिलांनी रिसेप्शनिस्ट बनू नये’, हा अशाच प्रकारचा फतवा आहे, जो सर्वानी पाळणे अशक्य आहे असे वासे यांनी सांगितले.फतवा म्हणजे खुदाचा आदेश किंवा हदीसमधील वचन नव्हे, हे सर्वानी समजून घेणे आवश्यक आहे. आक्षेपार्ह फतव्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे, असे मत येथील फत्तेपुरी मशिदीचे शाही इमाम मुफ्ती मुर्करम अहमद यांनी व्यक्त केले.