वृत्तसंस्था, नवी दिल्ली : फिनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) च्या करडय़ा यादीतून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानचे आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. दहशतवादी कारवायांना होणारा अर्थपुरवठा तसेच गुन्हगारी कारवायांतील अपसंपदेला वैध संपत्ती म्हणून भासविण्याचे प्रयत्न यांना आळा घालण्याबाबत निश्चित करून दिलेल्या कृती आराखडय़ाचे पालन पाकिस्तानकडून झाले असल्याचा निर्वाळा एफएटीएफने दिला असून तेथे स्थळ पाहणी करण्याची तयारी या आंतरराष्ट्रीय संस्थेने दाखविली आहे.
दहशतवाद्यांना अर्थपुरवठा आदी कारवायांना आळा घालण्यात पुरेशी प्रभावी उपाययोजना न करणाऱ्या देशांची समावेश एफएटीएफच्या करडय़ा यादीत केला जातो. अशा देशांशी होणाऱ्या अर्थव्यवहारांचे कमाल नियमन या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून केले जाते. स्थळ पाहणीचे निष्कर्ष समाधानकारक आढळल्यास संबंधित देशाला करडय़ा यादीतून बाहेर काढण्याबाबत एफएटीएफ विचार करू शकते.
पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणांत अनेक बडय़ा नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानात मनी लॉन्ड्रिंगच्या अनेक प्रकरणांतही कारवाया होत असल्याचा उल्लेख एफएटीएफच्या आढावा बैठकविषयक निवेदनात करण्यात आल्याचे वृत्त आहे.
