न्यूयॉर्क : एफबीआयच्या ‘१० मोस्ट वॉन्टेड फरार’ यादीतील एका महिलेला सहा वर्षांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी भारतात अटक करण्यात आली. सिंडी रॉड्रिग्ज सिंग असे या महिलेचे नाव असून १० मोस्ट वॉन्टेड यादीतील सात महिन्यांतील ही चौथी अटक असल्याची माहिती फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय)चे संचालक काश पटेल यांनी ‘एक्स’ समाज माध्यमावरून दिली.

अटकेचे श्रेय त्यांनी टेक्सासमधील कायदा अंमलबजावणी भागीदार, अमेरिकन न्याय विभाग आणि भारतीय अधिकाऱ्यांना दिले. सिंग खटला टाळण्यासाठी २०२३ मध्ये फरार झाली होती. तिच्या अटकेसाठी एफबीआयने २५ हजार डॉलर बक्षीसही जाहीर केले होते.

दरम्यान, या महिलेला एफबीआयने भारतीय अधिकारी आणि इंटरपोल यांच्या समन्वयाने भारतात अटक केली असून, तिला अमेरिकेत नेण्यात आले आहे आणि टेक्सासमधील अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले जाईल, असे सांगण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, सिंग हिचा अपंग मुलगा नोएल रॉड्रिग्ज-अल्वारेझ ऑक्टोबर २०२२पासून बेपत्ता होता.

टेक्सासच्या अधिकाऱ्यांनी त्याचा शोध घेतला. त्यावेळी सिंग हिने नोएल नोव्हेंबर २०२२पासून त्याच्या वडिलांसोबत मेक्सिकोत असल्याचे खोटेच सांगितले होते. त्यानंतर तिचा दुसरा पती आणि सहा अल्पवयीन मुलांसह भारतात पळून आली आणि नंतर कधीही अमेरिकेला परतली नव्हती. बेपत्ता झालेला नोएल विमानात चढलाच नव्हता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये टेक्सासच्या एका जिल्हा न्यायालयात या महिलेवर आरोप निश्चित करण्यात आले होते.