बांगलादेशी ब्लॉगर निलॉय चक्रबर्ती ऊर्फ नील यांच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणी आता अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन या संस्थेने तपासात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. बांगलादेशात गेल्या सहा महिन्यांत हत्या झालेला तो चौथा ब्लॉगर आहे, त्याच्या हत्येत अल काईदाशी संबंधित जिहादींचा हात असण्याची शक्यता गृहमंत्री असाउदझमान खान कमाल यांनी वर्तवली आहे.
कमाल यांनी वार्ताहरांना सांगितले जर अमेरिकेची फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन ही संस्था चौकशीत सहकार्य करण्यास तयार असेल, तर आमची काही हरकत नाही व त्यांनी चौकशीत सहकार्य करण्यात स्वारस्य दाखवले आहे. आपण पोलिस महानिरीक्षकांशी या प्रकरणी चर्चा केली असून मारेक ऱ्याना लवकरच पकडले जाईल. शुक्रवारी नमाजानंतर अपार्टमेंटमध्ये नीलचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला, त्याच्या मानेवर १४ जखमा झाल्या व काही वार त्याच्या हाडांची शकले करणारे होते. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार अमेरिकेच्या एफबीआय या संस्थेने चौकशीत सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे पण अजून अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. एफबीआयच्या पथकाने अमेरिकी नागरिक असलेले ब्लॉगर अविजित रॉय यांच्या हत्याप्रकरणी बांगलादेशला भेट दिली होती. आताच्या ब्लॉगर हत्येच्या घटनेमुळे बांगलादेशचा जगभर निषेध झाला असून पंतप्रधान शेख हसिना यांनी त्यांचे सरकार धर्मात राजकारण आणू देणार नाही असे स्पष्ट केले. पुन्हा असे प्रकार होऊ दिले जाणार नाहीत, संबंधितांना कठोरपणे हाताळले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. इस्लाम हा शांततामय धर्म आहे. मुस्लीम मुस्लिमांना मारतात, आत्मघाती हल्ले करतात, लोकांना ठार करतात, धर्मविरोधी लेखन करणाऱ्या ब्लॉगर्सना ठार करतात, हे काय चालले आहे, असा उद्विग्न सवाल त्यांनी केला. बांगलादेशात ९० टक्के लोक मुस्लीम आहेत पण बांगलादेश हा जात-धर्म मानणारा देश नाही, असे त्यांनी
स्पष्ट केले.