परीक्षेआधी कपडे काढून तपासणी होण्याच्या भीतीने दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील जशपूर येथे ही घटना घडली आहे. आत्महत्येआधी मुलीचं आपल्या भावाशी यासंबंधी बोलणं झालं होतं. आपल्या शाळेत कशाप्रकारे दोन मुली आणि एका मुलाला कॉपी आणली आहे का तपासण्यासाठी कपडे काढण्याची जबरदस्ती करण्यात आल्याचं मुलगी भावाला सांगत होती. जर माझ्यासोबत असं काही झालं तर मी जिवंत राहणार नाही असं 16 वर्षीय मुलीने आपल्या भावाला सांगितलं होतं. 4 मार्चला मुलीचा मृतदेह आढळला.

जिल्हाधिकारी निलेश क्षीरसागर यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र बुधवारी रात्रीपर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांचा जबाब नोंदवण्याची गरज आहे. पण सध्या परीक्षा सुरु असल्याने शाळा प्रशासन विद्यार्थ्यांना त्रास देऊ इच्छित नाही.

1 मार्च रोजी जशपूर येथील पांढरपठ परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची कपडे काढून तपासणी करण्यात आली होती. फ्लाईंग स्क्वॉडला तीन विद्यार्थ्यांवर संशय आल्याने वेगवेगळ्या खोलीत नेऊन त्यांचे कपडे काढून तपासणी करण्यात आली. यामध्ये दोन विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याचा समावेश होता. विद्यार्थ्याकडे चीट सापडल्याने त्याला शाळेतून काढून टाकण्यात आलं. विद्यार्थिनींकडे मात्र काहीच सापडलं नाही. पण यामुळे मानसिक खच्चीकरण झाल्याचं मुलींनी आपल्या मित्रांना सांगितलं.

पीडित मुलीने हे सगळं ऐकलं होतं आणि यामुळे घाबरली होती. घरी परतली तेव्हा ती घाबरलेली दिसत होती. तिच्या भावाने काय झालं असं विचारलं असता तिने घडलेला प्रकार सांगिंतला. आपल्यासोबत असं काही झालं तर जिवंत राहणार नाही असंही तिने सांगितलं होतं.

मुलीच्या कुटुंबाने अभ्यास झाला नसावा यामुळे ती घाबरली असावी असा अंदाज लावत तिला अभ्यासात लक्ष देण्यास सांगितलं होतं. दोन दिवस मुलगी काहीच न बोलता घरी शांत बसली होती. 3 मार्चला मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. एका गावकऱ्याला शेजारच्या जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळला. आत्महत्येमागे दुसरं कोणतं कारण आहे का याचा शोध घेत आहोत अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.