राज्यसभेत विरोधकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार देशाचे ध्रुवीकरण करीत असून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करीत असल्याचा आरोप विरोधकांनी सोमवारी राज्यसभेत केला. यापूर्वीच्या धोरणांचा लाभ गरिबांपर्यंत न पोहोचविताच केवळ त्या योजनांचे नव्याने नामकरण केले जात आहे, असा आरोपही विरोधकांनी केला.
केंद्रातील सरकार देशाला कलाटणी देणारे (गेमचेंजर) सरकार नसून केवळ नाव बदलणारे (नेमचेंजर) सरकार आहे आणि ते सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरले आहे. शेतकरी आणि गरिबांना मदत देणे, रोजगारनिर्मिती करणे आणि काश्मीर प्रश्नावर मार्ग काढणे आदी सर्व आघाडय़ांवर सरकार अपयशी ठरले आहे, असे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार ठरावाबाबतच्या चर्चेत भाग घेताना विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी, सरकार केवळ जनतेमध्येच नव्हे तर नोकरशहा आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरवित असल्याचा आरोप केला. सक्तवसुली संचालनालय, प्राप्तिकर विभाग, राष्ट्रीय तपाससंस्था यांच्या चौकशांचा ससेमिरा राजकीय पक्षांच्या मागे लावला जात आहे. विरोधी पक्षांसमवेत चर्चा करण्यास कोणी घाबरत असेल तर ते लोकशाही अथवा भाषणस्वातंत्र्यासाठी घातक आहे, असेही ते म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या अर्थसंकल्पोत्तर ‘नूतन भारत’ घोषणेचा समाचार घेताना आझाद म्हणाले, ‘महात्मा गांधी यांच्या काळातील भारत आम्हाला पुन्हा हवा आहे. त्या भारतात हिंदू-मुस्लिम सलोखा होता. बलात्कार होत नव्हते. मुख्य म्हणजे भीतीचे वातावरण नव्हते.’
विरोधी पक्षाच्या नेत्यांना संभाव्य दहशतवादी म्हणून वागणूक देण्यात येते आणि त्यांचे दूरध्वनी टॅप केले जातात, आपल्याशी कोणीही दूरध्वनीवरून संभाषण करीत नाही, आपला दूरध्वनी टॅप केला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, असेही आझाद म्हणाले. मी जम्मू-काश्मीर राज्याचा मुख्यमंत्री असताना अशा प्रकारची वागणूक दहशतवाद्यांना मिळत असे. पण आता सरसकट सगळ्याच विरोधकांना या प्रकारे वागवले जात असल्याचा आरोप आझाद यांनी केला. काँग्रेस, सपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणात ३२४ दुरुस्त्या सुचविल्या.
महात्मा गांधी यांच्या काळातील भारत आम्हाला पुन्हा हवा आहे. त्या भारतात हिंदू-मुस्लिम सलोखा होता. बलात्कार होत नव्हते. मुख्य म्हणजे भीतीचे वातावरण नव्हते.
– गुलाम नबी आझाद, विरोधी पक्षनेते