दिग्गज भारतीय महिला बॉक्सर आणि राज्यसभा खासदार मेरी कोमने देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांमुळे आपल्याला खूप त्रास आणि हतबल झाल्यासारखं वाटत असल्याचं म्हटलं आहे. २०१२ मधील निर्भया बलात्कारानंतर आता कठुआ आणि उन्नाव बलात्काराने देशाला हादरवून सोडलं आहे. देशभरात बलात्काराविरोधात निदर्शन होत आहेत. एकीकडे जम्मू काश्मीरमधील कठुआमध्ये आठ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली, तर दुसरीकडे भाजपा आमदार कुलीप सेंगर यांना उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

उन्नाव बलात्कार प्रकरणी पीडित तरुणीच्या वडिलांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला असून, आमदार कुलदीप सेंगर आपण निर्दोष असल्याचा दावा करत आहेत. गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थमध्ये सुवर्ण पदक जिंकून परतल्यानंतर एका टीव्ही चॅनेलशी बोलताना मेरी कोमने सांगितलं की, ‘सरकार जे काही करेल ते योग्य करेल. त्यांना माझ्यापेक्षा जास्त चांगलं कळतं. पण यामुळे मला दुख: झालं आहे. महिला असल्या कारणाने एका आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याचं ऐकून मी भावूक झाली आहे. भारतीय असल्या कारणाने मी दुखी झाली आहे. मला अगदी हतबल झाल्यासारखं वाटत आहे’.