सत्तेतून बाहेर पडण्याचे काँग्रेसचे राजदला आव्हान

बिहारमधील सत्तारूढ महाआघाडीमधील संघर्ष अधिकाधिक तीव्र होत असल्याचे स्पष्ट संकेत आता मिळत आहेत. राजद आणि जद(यू)मध्ये खटके उडत असतानाच महाआघाडीतील काँग्रेसने मुख्यमंत्री नितीशकुमार यांना पाठिंबा देऊन राजदला आव्हान दिले आहे. राजदला आघाडीत सुसह्य़ वाटत नसल्यास त्यांनी बाहेर पडावे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

आघाडीत आपल्याला सुसह्य़ वाटत नसल्यास आपण खुशाल बाहेर पडावे, असे बिहार काँग्रेसचे अध्यक्ष आणि मंत्री अशोक चौधरी यांनी म्हटले आहे. राजदच्या काही नेत्यांनी नितीशकुमार यांच्याबद्दल केलेल्या शेरेबाजीवर चौधरी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. महाआघाडी अबाधित आहे असे आपण एकीकडे म्हणता मात्र दुसरीकडे राजदचे नेते नितीशकुमार यांच्यावर शेरेबाजी करतात, असे चौधरी म्हणाले.

नितीशकुमार हे परिस्थितीनुसार झालेले मुख्यमंत्री आहेत, अशी टीका राजदचा वादग्रस्त नेता शहाबुद्दीन यांनी केली आणि त्याला राजदचे नेते रघुवंशप्रसाद सिंह यांनी पाठिंबा दिला त्यामुळे राजकीय संघर्ष पेटला असून त्यावर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली. राजदला इशारा देण्यासाठी जद(यू)च्या दोन ज्येष्ठ मंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेबद्दल चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारांमुळे तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो, असे ते म्हणाले.

लालूप्रसाद यांची सारवासारव

बिहारमधील सत्तारूढ जद (यू) आणि राजद महाआघाडीमध्ये शाब्दिक युद्धामुळे तडे पडत असल्याचे चित्र निर्माण होत असतानाच राजदचे नेते लालूप्रसाद यांनी मंगळवारी त्याबद्दल सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. महाआघाडीत संघर्ष असल्याचे वृत्त माध्यमांनी निर्माण केले आहे, मुख्यमंत्री नितीशकुमार हेच आघाडीचे नेते आहेत, असे लालूप्रसाद म्हणाले.