अजयकुमार भल्ला नवे गृहसचिव

नवी दिल्ली : आर्थिक आघाडीवर निराशाजनक स्थिती असताना केंद्राचे अर्थसचिव सुभाषचंद्र गर्ग यांची बुधवारी ऊर्जासचिवपदी बदली करण्यात आली. मावळते ऊर्जासचिव अजयकुमार भल्ला यांच्याकडे गृहसचिवपदाची सूत्रे येणार आहेत.

प्रशासनात ज्येष्ठ पातळीवर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, अर्थसचिव सुभाषचंद्र गर्ग यांची ऊर्जा विभागात बदली करण्यात आली.

रिझव्‍‌र्ह बॅंकेच्या स्वायत्ततेच्या मुद्यावर रिझव्‍‌र्ह बॅंकेचे तत्कालीन डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य आणि सुभाषचंद्र गर्ग यांच्यात वाद रंगला होता. आता आर्थिक आघाडीवर निराशानक स्थिती असताना गर्ग यांची बदली करण्यात आली आहे. १९८५ च्या तुकडीचे गुजरात कॅडरचे आयएएस अधिकारी अतनू चक्रवर्ती यांची आता अर्थसचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

मावळते ऊर्जा सचिव अजयकुमार भल्ला यांची सरकारने बुधवारी गृहमंत्रालयात विशेष कार्यपालन अधिकारी (ओएसडी) म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे ते नवे गृहसचिव बनणार हे निश्चित झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील नियुक्त्या समितीने भल्ला यांच्या गृहमंत्रालयात ओएसडी म्हणून तत्काळ प्रभावाने नियुक्तीला मंजुरी दिली. १९८४ च्या तुकडीचे आसाम मेघालय कॅडरचे आयएएस अधिकारी असलेले भल्ला हे येत्या ३१ ऑगस्टला सेवानिवृत्त होणार असलेले विद्यमान गृहसचिव राजीव गऊबा यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील, असे सांगण्यात येते.