राजस्थानच्या भिवाडी या ठिकाणी राहणाऱ्या अंजूने जयपूरला जाते सांगत थेट पाकिस्तान गाठलं. तिथे असलेला तिचा बॉयफ्रेंड नसरुल्लाहशी लग्न केलं. एवढंच काय निकाह करण्याआधी धर्म परिवर्तन करुन फातिमाही झाली. आता अंजूच्या पहिल्या पतीने म्हणजेच अरविंदने अंजूच्या विरोधात FIR दाखल केला आहे. भिवाडी येथील फूलबाग पोलीस ठाण्यात अंजूचा पती अरविंदने ही FIR दाखल केली आहे. भिवाडीचे पोलीस अधीक्षक यांनी FIR दाखल झाल्याचं म्हटलं आहे. तसंच अंजू आणि नसरुल्लाह या दोघांच्या विरोधात कलम ३६६, ४९४, ५००, ५०६ आणि IPC ६६ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सुरु केला तपास
अंजूचा पहिला पती अरविंदने भिवाडी पोलीस ठाण्यात FIR दाखल केल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. अंजूचं पहिलं लग्न झालेलं असूनही तिने पतीची फसवणूक केली आणि पाकिस्तानात जाऊन लग्न केलं. या प्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा आणि व्हॉट्स अॅपवर धमकी दिल्याचं प्रकरण नोंदवलं आहे.
हे पण वाचा- “पाकिस्तानात गेलेल्या अंजूचा व्हिसा आणि पासपोर्ट रद्द केला जावा आणि…”, पहिला पती अरविंदची मागणी
अरविंदच्या तक्रारीत काय म्हटलं आहे?
अरविंदने जी तक्रार दिली आहे त्यात असं म्हटलं आहे की अंजूने लग्न झालेलं असूनही पाकिस्तानात जाऊन नसरुल्लाहशी लग्न केलं. नसरुल्लाह आणि अंजू यांची फेसबुकवरुन मैत्री झाली. त्यानंतर त्याने अंजूला खोटी आश्वासनं दिली, खोटी स्वप्नं दाखवली. त्यानंतर अंजूला फूस लावून पाकिस्तानात बोलवलं. नसरुल्लाहला हे माहित होतं की अंजूचं लग्न झालं आहे आणि तिला दोन मुलं आहेत.
हे पण वाचा- आणखी एक Cross Border प्रेमकहाणी! आता चीनची तरुणी प्रियकरासाठी पोहचली पाकिस्तानात
तक्रारीत हे देखील म्हटलं आहे अंजूच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जावी. अंजूने पाकिस्तानात पोहचल्यानंतर धमकी दिली असाही उल्लेख अरविंदने केला आहे. अंजू २१ जुलैच्या दिवशी साधारण दुपारी पावणेतीनच्या सुमारास भिवाडी या ठिकाणाहून निघाली. तिने पाकिस्तानात पोहचत नसरुल्लाहशी निकाह केला. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांद्वारेच ही माहिती आपल्याला मिळाली असंही अंजूचा पहिला पती अरविंदने म्हटलं आहे. अंजूने आपल्याला व्हॉट्स अॅप कॉल केला होता आणि शिवीगाळ केली. तसंच मी तुझी हत्या घडवून आणेन अशीही धमकी तिने दिली असंही अरविंदने म्हटलं आहे. पाकिस्तानात तिचा व्हिसा आणखी सहा महिने वाढवण्यात आला आहे असंही अऱविंदने म्हटलं आहे.